आयपीएल 2027 पूर्वी क्रिकेटप्रेमींना एक मोठा ट्रेड पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पंजाब किंग्जमध्ये दाखल झाला आहे. तर, पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये एंट्री होताच कर्णधार कोण असणार यावरुन तर्क वितर्क सुरु झाले होते. कारण हार्दिक पांड्या 2022 पासून आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळतोय. पहिल्यांदा हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचं दोन वर्ष नेतृत्त्व केलं. तर, त्यानंतर तीन वर्ष मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पांड्याने जबाबदारी पार पाडली. यामुळं हार्दिक पांड्या पंजाबमध्ये येताच तो कर्णधार असेल का याबाबत तर्क वितर्क सुरु झाले होते. या सर्व गोष्टींना हार्दिक पांड्यानं पूर्णविराम दिला आहे. त्याने श्रेयस अय्यर हा माझा कर्णधार असेल, अशी पोस्ट केली आहे.
हार्दिक पांड्यानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यातील फोटोमध्ये हार्दिक पांड्या पंजाब किंग्जच्या जर्सीत पाहायला मिळतो. हार्दिकनं त्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की ” माझा कर्णधार श्रेयस, माझा कोच रिकी, माझी टीम पूर्ण पंजाब, मी तुमच्यासोबत उभा आहे.”
श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्त्व करणार
हार्दिक पांड्यानं केलेली पोस्ट पंजाब किंग्जकडून कोलॅब करण्यात आली आहे. त्यामुळं श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा कर्णधार राहणार हे स्पष्ट झालं आहे. 2022 नंतर पहिल्यांदा हार्दिक पांड्या एक खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये खेळेले. हार्दिक पांड्यानं गुजरातला एकदा विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी गुजरातचा संघ उपविजेतेपदापर्यंत पोहोचला होता. हार्दिक पांड्यानं मुंबईचं तीन वर्ष नेतृत्त्व केलं मात्र अपेक्षित कामगिरी मुंबई इंडियन्सला करता आली नाही.
2025 पासून श्रेयस कर्णधार
श्रेयस अय्यर याला पंजाबनं 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये खरेदी केलं होतं. त्यानंतर त्याला पंजाबचं कर्णधार केलं होतं. अय्यरच्या नेतृत्त्वात पंजाबनं 2025 च्या आयपीएलमध्ये फायनलपर्यंत धडक दिली होती. मात्र, अंतिम सामन्यात त्यांचा पराभव झाला.
श्रेयस अय्यरचं आयपीएल करिअर
श्रेयस अय्यरनं आयपीएलमध्ये 147 सामने खेळले आहेत. यापैकी 145 डावात त्यानं 35.83 च्या सरासरसीनं आणि 136.72 च्या स्ट्राइक रेट नं 4229 धावा केल्या आहेत. या दरम्यान एक शतक आणि 32 अर्धशतकं केली आहेत. श्रेयस अय्यरची सर्वोच्च धावसंख्या 101 धावा ही आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग या दोघांचा ट्रेड तब्बल 18 कोटींमध्ये पार पडला आहे. अर्शदीप मुंबईत दाखल झाल्यानं मुंबई इंडियन्सची गोलंदाजी आणखी अक्रकमक होईल.








