पत्नीसह तिच्या माहेरच्या कुटुंबातील एकूण सात सदस्यांची हत्या करण्याच्या दोन आठवडे आधी आरोपी पती दरोड्याच्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित राहिला होता. बंगळुरुत टॅक्सी चालक असलेला ५२ वर्षीय एस. इंदुशेखर हा २०१८ मधील दरोडा प्रकरणात मुख्य आरोपी आहे.
इंदुशेखरला ‘अर्जुन’ या नावानेही ओळखले जाते. त्याच्यावर मदनायकानहल्ली येथील एका मंदिर उत्सवाच्या पार्किंग परिसरात सोन्याची सशस्त्र लूट केल्याचा आरोप आहे. ७ जून २०१८ रोजी घडलेल्या या गुन्ह्यात तो सहा आरोपींपैकी एक असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी डिसेंबर महिन्यात होणार आहे.
जिने जामीन दिला, तिचाच जीव घेतला
दरोड्याच्या घटनेनंतर काही दिवसांतच सीसीटीव्ही फुटेजसारख्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे इंदुशेखरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची पत्नी सुनिता एम. जे. हिने त्याला जामीन मिळवून देण्यासाठी हमी दिली होती. मात्र १६ ऑक्टोबर २०२६ रोजी इंदुशेखरने याच पत्नीची आणि तिच्या ६५ वर्षीय आई रुपवती यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
बंगळुरु ग्रामीण जिल्हा सत्र न्यायालयाने २०२२ मध्ये त्याला जामीन मंजूर केला होता. त्यावेळी त्याची पत्नी एम. जे. सुनिता (त्यावेळी वय सुमारे ३५ वर्षे)’ हिने हमीपत्र सादर केले होते. यासोबतच तिने काचोहल्ली गाव येथील मालमत्तेचा खरेदीखत दस्तऐवज, आधार कार्ड, कर भरल्याची पावती, डिमांड रजिस्टर आणि एक घोषणापत्रही जोडले होते.
६ नोव्हेंबर २०२६ रोजी या सामूहिक हत्येची आणि टॅक्सी चालकाच्या अटकेची माहिती देताना पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग म्हणाले, “सुमारे सात वर्षांपूर्वी मदनायकानहल्ली येथे सोनसाखळी चोरीच्या एका प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती.”
इंदुशेखरची कार २०१८ मधील एका गुन्ह्यात पळून जाण्यासाठी वापरली गेली होती. त्यानंतर १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत, हत्या केलेल्या व्यक्तींचे शव कर्नाटक आणि तामिळनाडूतील दुर्गम डोंगराळ भाग आणि वनक्षेत्रांत नेऊन टाकण्यासाठी याच कारचा वापर करण्यात आला.
‘पोलीस वाणी’साठी खबऱ्या आणि पत्रकार
२०१८ मध्ये या कारवर ‘पोलीस वाणी’ नावाचे एक स्टिकर होते, ज्याच्या आधारे पोलिसांनी या गाडीचा शोध लावला होता. २०१८ मधील दरोड्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर, इंदुशेखरने आपण एक प्रतिष्ठित नागरिक असून पोलिसांचे खबरे आणि ‘पोलीस वाणी’ नावाच्या स्थानिक प्रकाशनासाठी पत्रकार असल्याचे सांगितले होते.
ज्यावेळी इंदुशेखरने आपल्या सहा बळींचे मृतदेह निर्जन स्थळी टाकले, तेव्हा त्याच्या कारवर ‘प्रेस’ असे लिहिलेले स्टिकर आणि ‘टाना वरदी’ नावाच्या आणखी एका प्रकाशनाचे स्टिकर होते.
‘प्रेस रजिस्ट्रार ऑफ इंडिया’च्या नोंदींनुसार, ‘टाना वरदी’ हे कन्नड आणि इंग्रजी भाषेतील एक मासिक प्रकाशन म्हणून २१ जानेवारी २०२६ रोजी नोंदणीकृत झाले होते. बंगळुरु ग्रामीण भागातील या प्रकाशनाचे संपादक आणि प्रकाशक म्हणून एस. इंदुशेखरचे नाव नोंदवलेले आहे.
‘मी ट्रिपवर होतो’
२०१८ मधील प्रकरणाच्या न्यायालयीन नोंदींनुसार, ७ जून २०१८ रोजी झालेल्या दरोड्याच्या ठिकाणी आपण उपस्थित नव्हतो, असा दावा इंदुशेखरने केला होता. त्याने सांगितले की, त्या वेळी तो दुसऱ्या एका कारमधून अॅप बेस्ड कॅबच्या ट्रिपवर बंगळुरुहून बेळगावला जात होता. मात्र, पोलिसांच्या तपासातून असे समोर आले की, त्या दरोड्याच्या वेळी इंदुशेखरच्याच कारचा वापर करण्यात आला होता.








