मुंबईत अमली पदार्थ तस्करीविरोधात कांदिवली गुन्हे शाखा 11 ने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 10 कोटी 16 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 2 किलो 32 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कांदिवली युनिटच्या कक्ष क्रमांक 11 च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोरीवली पश्चिम परिसरात कारवाई करण्यात आली.
सुरुवातीला दोन इसमांकडून 758 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 1 किलो 274 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. अशा प्रकारे तिन्ही आरोपींकडून एकूण 2 किलो 32 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत 10 कोटी 16 लाख रुपये आहे. याशिवाय तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी अमली पदार्थांची तस्करी कशा प्रकारे करत होते, तसेच या तस्करीमागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करीविरोधातील तपासाला महत्त्वाचे यश मिळाले असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.
भिवंडीत 119 कोडीन बॉटल जप्त
भोईवाडा पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीत मोठी कारवाई केली आहे. 119 कोडीन फॉस्फेटच्या बॉटल जप्त करून महाराष्ट्र ते राजस्थान पर्यंत पसरलेल्या आंतरराज्य साखळीचे धागेदोरे उघड केले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई स्वप्नील सुर्यवंशी यांना गोपनीय बातमी मिळाल्यानंतर स्कॉलर स्कूलच्या मागील गल्ली, सोमवार बाजार येथे सापळा लावून अकबर आदम शाह याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आणि बिलाशिवाय विक्रीसाठी आणलेल्या CODEINE PHOSPHATE च्या 119 बॉटल जप्त करण्यात आल्या. यानंतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात बँक व्यवहार आणि तांत्रिक पुराव्यांवरून भिवंडी, कल्याण, पालघर, गुजरात, राजस्थान येथे 2 पथके पाठवण्यात आली. यात अकबर आदम शाह – भिवंडी, जफर जब्बार रईस – कल्याण, वसीम शबीब शेख – पालघर, अरफात अलाउद्दीन शेख – कल्याण, अजितकुमार विक्रम सिंह – राजस्थान – बालाजी ट्रेडर्स प्रोप्रायटर यांना अटक करण्यात आली.








