Search
Close this search box.

FDA Raid: उंदीर-कीटकांचा सुळसुळाट अन् तेलकट फरशीवर खाद्यतेलाचे पॅकिंग; ऑईल रिपॅकिंग युनिटवर धाड, २३ लाखांचे तेल जप्त, परवानाही रद्द

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका भयंकर प्रकाराचा अन्न व औषध प्रशासनाने उलगडा केला आहे. शहरात सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत राबवलेल्या धडक कारवाईत जुना मोंढा परिसरातील मेसर्स बजरंग ट्रेडिंग कंपनी या ऑईल रिपॅकिंग युनिटवर अचानक छापा टाकण्यात आला. या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ वातावरणात भेसळयुक्त आणि संशयास्पद खाद्यतेलाचे री-पॅकिंग सुरू असल्याचे समोर आले आहे.

तपासणीदरम्यान या कारखान्यात जे दृश्य अधिकाऱ्यांना दिसले ते अत्यंत धक्कादायक होते. अन्न व औषध प्रशासनाच्या निकषानुसार तपासणी केली असता, या कंपनीला २०६ पैकी केवळ १० गुण (अवघे ५ टक्के) मिळाले असून, तिला ‘नॉन-कॉम्प्लायन्स’ (अपात्र) घोषित करण्यात आले आहे. कारखान्याच्या छतावर कचऱ्याचे मोठे ढीग साचले होते, तर कामगारांसाठी असलेले वॉशरुम अत्यंत घाणेरड्या अवस्थेत होते. जमिनीवर कोणतेही लाकडी किंवा प्लास्टिकचे कप्पे न वापरता खाद्यतेलाचे डबे थेट जमिनीवर ठेवले होते. सर्वत्र तेल सांडल्यामुळे फरशी अत्यंत तेलकट आणि घसरडी झाली होती. विशेष म्हणजे, कीटकांना रोखण्यासाठी खिडक्यांना जाळ्या नव्हत्या, तसेच उंदरांचा वावर रोखण्यासाठी पिंजरे किंवा ट्रॅप्स बसवले नव्हते. कामगारांची कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नव्हती आणि प्रक्रिया करताना कामगारांनी डोक्यावर कॅप, ॲप्रन किंवा हातमोजे घातलेले नव्हते. खाद्यतेलाची चाचणी घेण्यासाठी कंपनीत कोणतीही लॅब किंवा फूड टेक्नॉलॉजिस्ट नव्हता, तसेच खरेदी केलेल्या तेलाचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड किंवा बिले अधिकाऱ्यांना दाखवता आली नाहीत.

जप्त करण्यात आलेल्या खाद्यतेलाचा तपशील

– १. रिफाइंड सोयाबीन तेल (केशर गोल्ड ब्रँड – डबे व कॅन): ४०७.९ किलो, किंमत – ८५,९७०/- रुपये.

– २. रिफाइंड सोयाबीन तेल (सुटे / लूज – स्टोरेज टँक क्र. ६): ७,९८८.४ किलो, किंमत – १४,८५,८४२/- रुपये.

– ३. रिफाइंड सोयाबीन तेल (सुटे / लूज – स्टोरेज टँक क्र. २): २,९८८.४ किलो, किंमत – ५,५५,८४२/- रुपये.

– ४. रिफाइंड पामोलीन तेल (केशर गोल्ड ब्रँड – डबे): ७९ किलो, किंमत – १७,६००/- रुपये.

– एकूण जप्त साठा: १२,३८२ किलो, एकूण किंमत – २३,३५,६५४/- रुपये.

परवाना तात्काळ निलंबित; कठोर कारवाईचा इशारा

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका एल. झाडे (झोन २) आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे तेल बाजारात खपवणाऱ्या अशा भेसळखोरांविरुद्ध प्रशासनाने उगारलेल्या या बड्या कारवाईमुळे शहर आणि जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या बेकायदेशीर व अस्वच्छ अन्न प्रक्रिया केंद्रांवर कारवाईचे सत्र अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें