Search
Close this search box.

‘महादेवी’ अखेर कोल्हापूरच्या वाटेवर! अनंत अंबानींच्या ‘वंतारा’ची वैद्यकीय मदत सुरूच राहणार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अनंत अंबानी यांच्या ‘वंतारा’कडून वैद्यकीय काळजी सुरू ठेवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर, कोल्हापुरात ‘महादेवी’ या नावाने लोकप्रिय असलेली ‘माधुरी’ ही हत्तीण आता कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहे. उच्चाधिकार समितीने ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार माधुरीला शहरात परत आणण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती वंताराने गुरुवारी दिलेल्या निवेदनात दिली.

वंताराने दिलेल्या माहितीनुसार, उच्चाधिकार समितीने संबंधित पक्षांचे म्हणणे एकून घेतल्यानंतर, वैद्यकीय अहवालांचे अवलोकन करून आणि महाराष्ट्रातील नांदणी येथील सुविधेची पाहणी केल्यानंतर माधुरीच्या पुनरागमनाला मंजुरी दिली. या आदेशात अनेक अटी घालण्यात आल्या असून, माधुरीचा कोणत्याही मिरवणुकीत किंवा इतर कोणत्याही कामासाठी वापर केला जाऊ शकत नाही. तसेच तिला २४ तास देखभाल आणि दर पंधरा दिवसांनी वैद्यकीय तपासणीची गरज असेल, असेही वंताराने स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेल्या उच्चाधिकार समितीच्या निर्देशांचे पालन करत ३० जुलै २०२५ रोजी माधुरीला जामनगर येथील वंतारा येथे आणण्यात आले होते. वंताराने तिचा ताबा मागितला नव्हता, तर मिळालेल्या निर्देशांनुसार तिचे स्वागत करून तिची देखभाल केली होती, असे संस्थेने सांगितले. सततच्या पशुवैद्यकीय उपचारांमुळे माधुरीची प्रकृती स्थिर झाली आहे, परंतु तिच्या दीर्घकालीन आजारांवर अजूनही आधारभूत उपचार आणि नियमित देखरेख आवश्यक आहे, असे संस्थेने नमूद केले.

हस्तांतरणाचा भाग म्हणून, वंताराने नांदणी येथील सुविधेमध्ये राहण्याची व्यवस्था, पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा, वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि इतर आवश्यक गोष्टींची सोय करण्यास मदत केली आहे. उच्चाधिकार समितीच्या निर्देशानुसार वंताराचे पशुवैद्यकीय अधिकारी दर पंधरा दिवसांनी कोल्हापूरला जाऊन माधुरीची वैद्यकीय तपासणी करतील आणि सक्षम प्राधिकरणांकडे अहवाल सादर करतील.

उपलब्ध पायाभूत सुविधांच्या मर्यादेत नांदणी येथील आवारात सुधारणा करण्यासाठी काम केले असल्याचेही वंताराने सांगितले. ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरून जाणारा रस्ता आणि नगररचनेच्या मर्यादांमुळे सध्या पुढील सुधारणांवर बंधने आहेत. तसेच भविष्यात या सुविधेच्या विस्तारासाठी किंवा सुधारणांसाठी वंतारा नेहमी तयार असेल आणि न्यायालये किंवा सक्षम प्राधिकरणांनी निर्देश दिल्यास मदत करेल, असेही संस्थेने पुढे जोडले.

“माधुरीचे कल्याण हीच वंताराची पहिली प्राथमिकता आहे. तिचे आरोग्य, कल्याण आणि सन्मान यांबद्दलची आमची बांधिलकी ती कुठे राहते यावर अवलंबून नाही,” असे या निवेदनात म्हटले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें