मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे. अलीकडेच अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे माझ्या भावासारखे असल्याचे सांगत त्यांना थेट घरी जेवायला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्याबाबत भाष्य केले आहे. राज्यात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे करायचं ते शांतीपूर्वकच करेल, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. त्या शनिवारी अहिल्यानगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (Maharashtra Politics news)
अमृता फडणवीस यांनी शनिवारी अहिल्यानगर येथे समर्पण चतुर्मास कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. तेव्हा अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत भाष्य केले. मराठा आरक्षणाचा विषय हा संवेदनशील असून राज्य सरकार त्यावर मार्ग काढेल, असा विश्वासही अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.
यापूर्वी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगेंना मुंबईत घरी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी जरांगे यांचा उल्लेख भाऊ असा केला होता. मनोज जरांगे पाटील यांनीही चतुराईने याला उत्तर दिले होते. ताईने सांगितलंय ना…मग जेवायला पण जाऊ…पण भाऊ मैदानात असताना, आंदोलन करत असताना बहिणीने जेवण्यासाठी भाऊला बोलवू नये. शिकारीच्या वेळेला इकडेतिकडे बघू नये. बहिणीने याबाबत बारकाईने विचार करावा. मी भाऊबीजेला जेवायला येईन. बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं, साडीचोळी घेऊन जाऊ, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. मनोज जरांगे पाटील हे आज अंतरवाली सराटीत मुंबईतील आंदोलनाच्या तारखेची घोषणा करणार आहेत. मनोज जरांगे गणपतीच्या काळात मुंबईत आल्यास कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांना परिस्थिती हाताळणे बिकट होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने सध्या जरांगेंशी कोणतीही थेट चर्चा न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.








