इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी20 लीग आहे. या स्पर्धेकडे जगातील सर्व क्रिकेट प्रेमींच लक्ष असतं. 28 फेब्रुवारी पासून यंदाचा आयपीएल 2026 चा सीजन सुरु झाला होता आणि त्याची सांगता येत्या रविवार 31 मे रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ मागील काही दिवसात समोर आली आहे. या सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी पोलिस सतत तपास करत असून आरोपींच्या मुसक्या आवळत आहेत. आता सध्या 19 व्या सीजनमध्ये प्लेऑफचे सामने खेळवले जातायत. मंगळवार 26 मे पासून प्लेऑफ सामान्यांना सुरुवात झाली. या दरम्यान आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या कोल्हापुरातील इचलकरंजी शहरातील क्रिकेट बेटिंग टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील क्रिकेट बेटिंग आणि सट्टा प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत मुख्य आरोपीच्या घरावर पुन्हा छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 104 संगणक, तीन अलिशान चारचाकी वाहने, 12 मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असा एकूण 87 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात नगरसेवक नितेश पोवार यांच्यासह नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या सट्टा रॅकेटमधील आर्थिक व्यवहार, तांत्रिक नेटवर्क आणि अन्य संबंधितांचा तपास सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे.
लातूरमध्येही आयपीएल सट्ट्यावर छापे :
एप्रिल महिन्यात लातूर स्थानिक गुन्हे शाखेने अंबेजोगाई रोड परिसरात छापा टाकत सट्टा चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आलं होतं. लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत चार आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 13 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच यात जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि क्रेटा कारचा समावेश आहे. हे आरोपी आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेत असल्याचे तपासात उघड झाले होते. इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून हे सट्टेबाज हा अवैध्य व्यवसाय करत होते.
मे महिन्यात सुद्धा लातूरमधील येरोळ मोड येथे ऑनलाईन आयपीएल सट्ट्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ मोड येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत मारुती स्वीफ्ट कारमध्ये बसून ऑनलाईन क्रिकेट बेटिंग स्वीकारणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तातेराव शिवाजी दंडीमे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम, डायऱ्या, कॅल्क्युलेटर आणि कार असा तब्बल 7 लाख 6 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यावर बेटिंग करत होते.








