राज्यातील 10 वी आणि 12 वी परीक्षेचा (Exam) निकाल नुकताच जाहीर झाला असून 10 वी नंतर अनेकांनी नीट (NEET) परीक्षेची तयारी सुरू केली आहे. तर, 12 वीच्या (HSC) परीक्षेनंतर कित्ये विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता, ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असून काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता.
देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, देशभरात 42 तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हा परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर
पेपरीफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली असून सीबीआयमार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. देशभरात गेल्याच आठवड्यात म्हणजेच 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. आता, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र 3 मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही, मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
281 प्रश्न असलेल्या guess paper मधील 131 प्रश्न जसेच्या तसे NEET च्या प्रश्नपत्रिकेत येत असतील तर 2024 प्रमाणे यंदा देखील परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झाला हे स्पष्ट आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात देखील असाच प्रकार SRPF परीक्षेच्या संदर्भात देखील झाला होता. ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळात विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणं योग्य नाही. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करावी, ही विनंती, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणाले.








