काँग्रेसने तामिळनाडूमध्ये DMK सोबत असलेली आपली अनेक वर्षांची जुनी युती तोडली आहे. काँग्रेसने अभिनेता विजय यांच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाला नवीन सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईस्थित टीव्हीके मुख्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय यांची भेट घेत सरकार स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसचे 5 आमदार निवडून आले आहेत. ही नवीन युती केवळ सरकार स्थापनेपुरती मर्यादित नसून, भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांसाठीही असेल, असे AICC ने स्पष्ट केले आहे. ही युती पेरुंथलैवर कामराज यांचा सुवर्णकाळ पुन्हा आणण्यासाठी, तसेच पेरियार यांचे सामाजिक न्यायाचे विचार आणि डॉ. बी. आर. आंबेडकरांच्या घटनात्मक आदर्शांच्या वचनबद्धतेवर आधारित आहे.
काँग्रेसचा सशर्त पाठिंबा
दरम्यान, काँग्रेसचा पाठिंबा अटींवर आधारित आहे. TVK ने भाजप किंवा इतर कोणत्याही जातीयवादी शक्तींशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये, अशी अट काँग्रेसने घातली आहे. तामिळनाडूतील जनतेने, विशेषतः तरुणांनी धर्मनिरपेक्ष आणि प्रगतीशील सरकारसाठी दिलेला जनादेश लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे काँग्रेसचे प्रभारी गिरीश चोडणकर यांनी सांगितले. गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि DMK मधील संबंधांमध्ये तणाव होता. राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन यांनी प्रचारादरम्यान एकाच व्यासपीठावर आले नव्हते. त्यामुळे सुद्धा दोन्ही पक्षात दुरावा वाढल्याची चर्चा रंगली होती.
INDIA आघाडीवर परिणाम?
या निर्णयामुळे राष्ट्रीय स्तरावरील INDIA आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, काँग्रेसच्या नेत्यांनी इतर राज्यांतील उदाहरणे देऊन (जिथे घटक पक्ष एकमेकांविरुद्ध लढतात) आघाडी टिकून राहण्याचे संकेत दिले आहेत.
तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष बनला
दुसरीकडे, थलपथी विजय यांचा पक्ष, तामिळनाडू वेत्री कळघम (TVK), 108 जागा जिंकून तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, परंतु त्यांना अजूनही बहुमताची गरज आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 118 आमदारांची आवश्यकता आहे. विजय यांनी दोन जागा जिंकल्यामुळे एक जागा रिक्त करावी लागेल, ज्यामुळे TVK कडे 107 जागा उरतील. त्यामुळे, आणखी 10 आमदारांची गरज आहे. TVK च्या सूत्रांनुसार, आघाडीसाठी इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. पाच आमदार असलेल्या काँग्रेससोबतचा करार जवळपास अंतिम झाला आहे. उर्वरित पाच आमदारांसाठी VCK, CPI आणि CPM सोबत चर्चा सुरू आहे. या तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत.








