मुंबईत जो कडक नियम आहे तोच कडक नियम आता पुण्यात लागू होणार आहे. मुंंबई प्रमाणे आता पुण्यात देखील कुठेही आंदोलन करता येणार नाही. नवले पूल आणि टिळक चौक यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि वर्दळीच्या ठिकाणी आता आंदोलन किंवा ‘रास्ता रोको’ करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहरातील वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. नसरापूर ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे पुणे शहरात प्रचंड कोंडी झाली होती. आता यापुढे कोणालाही नवले पूल परिसरात आंदोलन करता येणार नाही.
20 मे 2026 रोजी नवले पुलावर आंदोलन करण्यात आले. 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर नसरापूरकरांचा संतापाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. नसरापूर ग्रामस्थांनी नवले पुलावर ठिय्या आंदोलन केलं होतं. कुटुंबीयांनी बालिकेचा मृतदेह रस्त्यावर ठेवत नवले पूल परिसरात ठिय्या मांडला होता. यामुळे पुणेकरांना अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नराधमाला तातडीने फाशी देण्याची मागणी करत पीडित कुटुंब तसंच ग्रामस्थांनी प्रशासनासमोर आक्रोश केला. या आंदोलकांनी चार तास महामार्ग रोखून धरला होता. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश दिले. नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात शनिवारी (२ मे) सायंकाली आंदोलन केले. आंदाेलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी करून चार तास या भागात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे भागातील वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई, तसेच साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. वाहनांची रांग पंधरा किलोमीटरपर्यंत गेली होती. वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, प्रवासी, मालवाहू वाहने अडकून पडली होती. नागरिक, तसेच प्रवाशांनी याबाबतची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाकडे केली होती. या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी संवाद साधला.
‘आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या तपासावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष ठेवले आहे. पीडित बालिका, तसेच तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कटीबद्ध आहेत’, असे त्यांनी सांगितले. अखेर चार तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. रात्री साडेदहानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, काही जण नवले पूल परिसरातून जाण्यास तयार नव्हते. पोलिसांनी त्यांची समजूत घातली. सैाम्य बळाचा वापर पोलिसांना करावा लागला. त्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. यापार्श्वभूमीवर बाह्यवळण मार्ग, तसेच नवले पूल परिसरात आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, ‘ मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्ग हा महत्त्वाचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था, तसेच वाहतूक विचारात घेऊन या भागात आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. यापुढील काळात नवले पूल परिसरात आंदोलन केल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलिसांचे आदेश धुडकाविल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. मुंबई प्रमाणे पुण्यातही आता आंदोलनासाठी जागा निश्चित करण्याचे संकेत दिले आहेत.








