स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत हेळसांड होत बाब समोर आली आहे. गडावरील सर्व 59 सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याचे उघड झाले आहे. देखभाल व दुरुस्तीच्या अभावामुळे ही यंत्रणा पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान हे सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. रायगड प्राधिकरण आणि पुरातत्त्व विभागाच्या वतीने गडावर विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पूर्वी हत्तीखाना परिसरात यंत्रणेचे कंट्रोल युनिट कार्यरत होते. मात्र, उत्खननातून सापडलेल्या वस्तूंचे संग्रहालय येथे उभारण्यात आल्याने कंट्रोल रूम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हे काम अपूर्णच राहिल्याने संपूर्ण यंत्रणा बंद पडल्याची बाब समोर आली आहे.









