Search
Close this search box.

Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा अलिबाग तालुक्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा आरोप केला. राहुल नार्वेकर हे कोकणातल्या जमिनी गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात घालत असल्याचा आरोप राऊतांनी केला. म्हात्रोळी गावातील जमीन ही एका गुजराती उद्योगपतीच्या फार्महाऊससाठी हवी होती, म्हणून नार्वेकर त्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन गेले होते असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील राहुल नार्वेकरांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक दाम्पत्य नार्वेकरांच्या सहकाऱ्यांवर आरोप करताना दिसत आहे. आपण घरी नसताना आपल्या जमिनीची मोजणी कशी केली असा प्रश्न हे दाम्पत्य विचारताना दिसत आहे. त्यानंतर राहुल नार्वेकरांनी त्या ठिकाणाहून पाय काढता घेतला.

संजय राऊतांचा आरोप काय? 

राहुल नार्वेकरांच्या या व्हिडीओनंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “गुजरातच्या एका उद्योजकाला फार्म हाऊस बांधायचं आहे, म्हात्रोळीतील ती जागा त्याच्या नजरेत भरली. ती जागा त्याच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर सरकारी मोजणी अधिकारी घेऊन गेले. कुटुंबातील एक कार्यक्रम असल्याने, त्या जागेचे मालक बाहेरगावी गेले होते, ते घरी नव्हते. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सरकारी अधिकारी त्या ठिकाणी गेले आणि मोजणी सुरू केली.

या व्हिडीओमध्ये अर्धवट दिसतंय, त्या माऊलीने कुणाकुणाच्या कानफटीत मारलंय याचा पूर्ण व्हिडीओ समोर येईल. अधिकाऱ्यांना मारहाण झालीय. आमच्या जमिनी तुम्ही बळकावताय मग आम्ही शांत बसू का? असं संजय राऊत म्हणाले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये तेच सुरू आहे. गुजरातच्या टोळधाडी हे भाजपचे पुढारी विधानसभा अध्यक्ष कोकणामध्ये आणत आहेत. ते कोकणचं स्मशान करत आहेत, गुजरात करत आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला.

भांडण सोडवायला नार्वेकरांना कोण बोलावलं होतं?

ज्या माऊलीने अशा अधिकाऱ्यांना मारहाण केली, मी त्या माऊलीचं अभिनंदन करतोय, तिने या सत्ताधाऱ्यांची लायकी काय आहे हे महाराष्ट्राला दाखवलं. देवेंद्र फडणवीस हे स्वतःला चौकीदार समजतात आणि त्यांचे नेते शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावतात? नार्वेकर म्हणाले की, ते भांडण सोडवायला गेले. पण भांडण सोडवायला तुम्हाला कुणी बोलावलं? त्या आडवळणाला तुम्ही तिकडे का गेला?

शनिवारी आणि रविवारी राहुल नार्वेकर हे कोकणातच असतात, जमिनी पाहत असतात. अलिबागला गेल्यानंतर दिसेल की ते आता मराठी माणसाचं राहिलं नाही. रहेजा, लोढा अशा बिल्डरांनी त्या जागा बळकावल्या आहेत असं संजय राऊत म्हणाले.

admin
Author: admin

और पढ़ें