Search
Close this search box.

Ashadhi Ekadashi 2026 Mahapuja: फडणवीसांसोबत विठ्ठलाची महापूजा करणारं मानाचं जोडपं कोण? स्वत:साठी मग कोणासाठी घातलं साकडं? देवाकडं काय मागितलं?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यंदा मुख्यमंत्र्यासह शासकीय महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगावच्या माने कुटूंबीयांना मिळाला. प्रभावती बाबासाहेब माने व बाबासाहेब माधव माने (वय वर्ष 70) यांनी आज मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची पूजा केली.

हात कमरेवर ठेवून भक्तांच्या भेटीची वाट पाहणारा विठ्ठल. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. अनेक दिवसांचा पायी प्रवास करून आलेल्या या वारकऱ्यांसाठी विठुरायाचं दर्शन म्हणजे त्यांच्या वारीची खरी फलश्रुती आहे. ज्ञानोबा-तुकाराम’, ‘माऊली-माऊली’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषाने पंढरी दुमदुमून गेली आहे. आपल्या कुटुंबासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुख-समृद्धीची प्रार्थना करत वारकरी विठुरायाच्या चरणी माथा टेकवत आहेत. आज पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळाल्याने  धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगावच्या माने कुटूंबीयांनी  समाधान व्यक्त केलं आहे. ‘भरून पावलो’ अशी प्रतिक्रिया प्रभावती बाबासाहेब माने व बाबासाहेब माधव माने यांनी व्यक्त केली आहे.  विठ्ठलाच्या चरणी त्यांनी ‘शेतकरी सुखी होऊ दे,  भरपूर पाऊस पडू दे,’ अशी मागणी केली. विठुरायाच्या कृपेने शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी भावना या मानकरी दाम्पत्याने व्यक्त केली.

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची शासकीय महापूजा व अभिषेक करून महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठूमाऊलीच्या चरणी प्रार्थना केली, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुजेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनाने मन कृतार्थ झाले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, युवक आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. तसेच बळीराजाच्या श्रमांना यश लाभो, आणि महाराष्ट्र सदैव प्रगतीपथावर राहो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

पाऊस चांगला पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्राच्या जनतेवर विठ्ठलाची कृपादृष्टी कायम राहू दे, अशी या विठुरायाच्या चरणी प्रत्येक वारकऱ्याची प्रार्थना आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत लाखो भाविक दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या तीरावर भक्तीचा महासागर उसळला आहे. आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. भाविकांची गर्दी, तर दुसऱ्या बाजूला विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा… हातात टाळ, मुखी हरिनाम आणि मनात विठ्ठल अशी ही पंढरी आज भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस म्हणजे त्यांच्या भक्तीची परिपूर्ती आहे. पायांना आलेले फोड, प्रवासाचा थकवा आणि वाटेतल्या अडचणी विसरून प्रत्येक वारकरी केवळ विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीत दाखल झाला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें