मुंबईतील मुलुंड परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान शनिवारी दुपारी गंभीर अपघात घडला. एलबीएस मार्गावरील उभारणीच्या कामात असलेला काँक्रीट स्लॅब अचानक कोसळल्याने काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास जॉन्सन गार्डनजवळील बसथांब्याजवळ हा अपघात झाला. स्लॅब कोसळताना खाली उभ्या असलेल्या दोन ते चार वाहनांनाही फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. काही जण जखमी झाल्याची शक्यता असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवून अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून जखमींना जवळील खासगी रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे एलबीएस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ वाहने रांगेत अडकली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक वळवण्याची उपाययोजना करण्यात येत आहे.









