विचार करा सामना जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे हातात आहे. आता फक्त ओव्हर संपायची वाट बघायची. पण सामन्यात असं काही झालं की शेवटच्या ६ धावा पण खेळाडू घेऊ शकला नाही. हा कारनामा झाला विजय हजारे ट्रॉफीच्या गोवा विरुद्ध महाराष्ट्र या सामन्यात. विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राच्या रामकृष्ण घोषने गोव्याविरुद्ध असा काही करिश्मा करून दाखवला की संपूर्ण क्रिकेटविश्व आश्चर्यचकित झाले आहे. जवळपास हरलेला सामना आपल्या अचूक आणि धगधगत्या गोलंदाजीच्या जोरावर रामकृष्ण घोषने महाराष्ट्राच्या बाजूने झुकवला आणि नवा इतिहास घडवला.
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये थरारक सामना
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मधील महाराष्ट्र विरुद्ध गोवा हा सामना गुरुवारी, 8 जानेवारी 2026 रोजी जयपूरच्या डॉ. सोनी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत रोमांच शिगेला पोहोचला होता. लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळणारी कामगिरी रामकृष्ण घोषने या सामन्यात सादर केली. सामन्याच्या निर्णायक क्षणी महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने अखेरचा ओव्हर रामकृष्ण घोषकडे सोपवला आणि याच निर्णयाने सामन्याचं चित्र पालटलं.
अखेरचा ओव्हर ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
गोव्याला विजयासाठी अखेरच्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावांची गरज होती. सामना जवळपास महाराष्ट्राच्या हातातून निसटलेला वाटत होता. मात्र रामकृष्ण घोषने अफलातून नियंत्रण दाखवत अखेरचा ओव्हर पूर्णपणे मेडन टाकला. एकही धाव न देता त्याने महाराष्ट्राला 5 धावांनी अविश्वसनीय विजय मिळवून दिला. या सामन्यात रामकृष्ण घोषने 10 ओव्हर्समध्ये केवळ 35 धावा देत 1 विकेट घेतली. विशेष म्हणजे त्याने आपल्या स्पेलमध्ये 2 मेडन ओव्हर्स टाकत गोव्याच्या फलंदाजांवर जबरदस्त दबाव निर्माण केला.
शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये गोवा ठरला अपयशी
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 250 धावांचं आव्हान उभं केलं होतं. प्रत्युत्तरात गोव्याला शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये फक्त 11 धावांची गरज होती. मात्र इथूनच रामकृष्ण घोषने सामन्याची दिशा बदलली.
रामकृष्णने डावाचा 48 वा ओव्हरही मेडन टाकला. 49 व्या ओव्हरमध्ये गोवाला कसाबसा 5 धावा काढता आल्या, पण अखेरच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा रामकृष्णने मेडन टाकत सामना पूर्णपणे महाराष्ट्राच्या बाजूने वळवला आणि क्रिकेटविश्वात खळबळ उडवली.
IPL 2026 मध्ये CSK कडून संधी?
विजय हजारे ट्रॉफीत खळबळजनक कामगिरी करणारा रामकृष्ण घोष इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा भाग आहे. सीएसकेने त्याला 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर रिटेन केले आहे. आतापर्यंत त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नसली, तरी या कामगिरीनंतर सीएसके मॅनेजमेंटचं लक्ष त्याच्याकडे नक्कीच गेलं असणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









