शिवडीतील जेष्ठ शिवसैनिक दगडू सकपाळ यांना शिवसेनेत येण्याची थेट ऑफर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दगडू सकपाळ लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत करणार पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत दगडू सकपाळ यांनी आपण नाराज असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक जुन्या शिवसैनिकांसोबत दगडू सकपाळ यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील जून्या शिवसैनिकांचा कॅडर आपल्याकडे यावा यासाठी शिवसेना पक्ष आग्रही असल्याची माहिती आहे. दगडू सपकाळ शिवसेनेत गेल्यास शिवडी भागात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले दगडू सकपाळ?
मी एकनाथ शिंदेंची भेट घेतली नाही. ते घरी आले राजकारणासाठी तर काय हाकलून देऊ? 10-15 मिनिटं कुटुंबाबद्दल बोलणं झालं. ते काल प्रचाराला इकडे फिरत होते. 10 वाजता त्यांचा प्रचार संपला. 10.15 वाजता ते दारात आले. तसे ते आमचे नातेवाईक आहे. आमच्या गावाशेजारी त्यांचे गाव असल्याचे दगडू सकपाळ म्हणाले.
मी नाराज असल्याचे यावेळी सकपाळ यांनी स्पष्टपणे सांगितले. ज्या पक्षाने मला एवढं मोठं बनवलं. मातोश्री आमची दैवत आहे. ‘दादा मी तुमच्यासोबत आहे. रेश्माचं काय करायचं आपण बघू, इतकं जरी बोलले असते तरी खूप झालं असतं, असं ते उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले. ‘आमची गरज संपली, माणसं म्हातारी झालं की गरज संपते. अपमान करुन घेण्यापेक्षा घरात बसलेलं चांगलं’, असेही ते पुढे म्हणाले.
‘माझ्या बॉसने मला डावललं एवढं मला माहिती आहे. जेव्हा नगरसेवक निवडीची चर्चा झाली मी आणि आमदार अजय चौधरी तिथे नव्हतो. मी 15 वर्षे तुमच्याकडे काही मागितलं नाही. आता माझ्या मुलीची इच्छा आहे. तिला एक सीट द्यावी अशी माझी इच्छा होती’, असे दगडू सकपाळ म्हणाले.
यापुढे माझं घर आणि मी अशी माझी स्ट्रॅटर्जी असणार आहे. मला कोणी बोलावलं तर मी जाईन. भविष्यात एकनाथ शिंदेकडून ऑफर आली तर बघू. ज्या पक्षाला माझी गरज असेल तेव्हा मी बघेन. आम्हाला उद्धव ठाकरेंनी मोठं केलं. आम्ही त्यांच्याबद्दल बोलावं या लायक नाही. आता म्हातारा झालाय काय गरज आहे, असं त्यांना वाटलं असेल. या वयात हे लक्षात आलं ते डोक्यात घेण्यापेक्षा घरी बसलेलं बरं, असे दगडू सकपाळ म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिलिंद देवरा, नितेश राणे होते. घरी आलेल्या पाहुण्यांसोबत अपमानजनक बोलणे ही आपली हिंदू संस्कृती नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.









