कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकी वाहनांसह अनेक दुकाने जळून खाक झाली.या आगीने व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.आजरा-आंबोली मार्गावरील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या ‘भाई-भाई चित्रमंदिर’ समोरील दुकान गाळ्यांना पहाटे आग लागली.आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर परिसरात मोठे आवाज होऊ लागले.या आवाजामुळे स्थानिक नागरिक जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.दुकान गाळ्यांच्या खालच्या मजल्यावर कार रिपेअरिंग गॅरेज होते.आगीची झळ या गॅरेजला बसल्याने तिथे असलेल्या 7 चारचाकी गाड्या पूर्णपणे जळून कोळसा झाल्या.व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दुकानातील साठा आणि फर्निचर पूर्णपणे जळून खाक झालं आहे.आग नेमकी कशामुळे लागली याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीचा वेग इतका प्रचंड होता की काही वेळातच सर्वकाही भस्मसात झाले.









