दादरमधील शिवाजी पार्क येथे असणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग फासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही अज्ञातांनी पुतळ्याला लाल रंग फासण्याचा प्रयत्न केला. यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तणावाचं वातावरण आहे. घटना समोर आल्यानतंर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस सध्या अज्ञाताचा शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांनी अद्याप याप्रकरणी तक्रार आलेली नसून, आम्ही स्वत:हून दखल घेत तक्रार दाखल करु असं सांगितलं आहे.
नेमकं काय झालं?
दादरमधील शिवाजी पार्क येथे अगदी शिवसेना भवनच्या समोरच मीनाताई ठाकरेंचा अर्धाकृती पुतळा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं घरही पुतळ्यापासून थोड्याशा अंतरावर आहे. या पुतळ्यावर एका अज्ञात व्यक्तीने लाल रंग फासण्याचा प्रयत्न केला असा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे. माहिती मिळताच शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले आणि पुतळ्याची साफसफाई सुरु केली. दरम्यान तणाव निर्माण झाल्याने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षा वाढवली आहे.
शिवसेनेने काय म्हटलं आहे?
“एखादी मनोरुग्ण किंवा विकृत मानसिकतेची व्यक्तीच असं करु शकते. जो सामान्य माणूस आहे तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पक्षाचा असो तो आपल्यात हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल इतक्या घृणास्पद पद्धतीने वागू शकत नाही. अशा विकृतांचं काय करायचं हे सरकारने ठरवावं. सीसीटीव्हीच्या आधारे ताब्यात घेणं आणि सामाजिक आरोग्य बिघडणार नाही यासाठी तात्काळ कारवाई करणं गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. हे जमत नसेल तर तसं जाहीर करावं,” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “12 तासाच्या आत ती व्यक्ती समोर हजर राहिली पाहिजे. ज्याने कोणी केलं हे कळलं पाहिजे, निवडणुकीच्या राजकारणासाठी कोणी हे गलिच्छ कृत्य करत असे तर तेदेखील किळसवाणं आणि घृणास्पद आहे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी. जरी एका मोठ्या राजकारण्याच्या पत्नी असल्या तरी मीनाताई ठाकरे पक्षीय राजकारण, वादात पडल्या नाहीत. त्यांनी संपूर्ण आयुष्यात कोणतंही राजकीय विधान केलं नाही. असं असतानाही इतका तिरस्कार, घृणास्पद प्रकार शिवसैनिकांच्या भावना दुखावणारं आहे. तात्काळ संबंधितावर कारवाई करावी. कृपया आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये”.
भाजपाची पहिली प्रतिक्रिया
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना जर असं काही घडलं असेल तर मी त्याचा निषधेच करतो असं म्हटलं आहे. “अशा प्रकारचं कृत्य झाल्यास त्याचा मी धिक्कार आणि निषेधच करतो. मीनाताई ठाकरे या वात्सल्यमूर्ती होत्या, त्यांना माँसाहेब म्हणायचे. त्यांना महाराष्ट्रात मातृतूल्य आदराचं स्थान होतं. त्यामुळे एखाद्या विकृत मानसिकतेतून हे झालं असावं. एखादा विकृत मानसिकतेचाच हे करु शकतो. पोलीस त्याचा शोध घेतील. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्याला पकडून सर्वांसमोर आणतील असा मला विश्वास आहे. निश्चित यामागे तणाव किंवा इतर काही उद्देश असावा. लवकरात लवकर तपास करुन प्रकऱण मार्गी लावावं असं माझंही पोलिसांना आवाहन आहे”.
