नवसाला पावणारा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) गणेशोत्सव मंडळा (Ganeshotsav Mandal) विरोधात आता कोळी बांधवांकडून (Koli Community) गंभीर आरोप करण्यात येत आहेत. ज्या कोळी समुदायाने (Koli Samaj) लालबागच्या राजाची स्थापना केली, त्यालाच आता डावलण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप होत आहे. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने (Akhil Maharashtra Machhimar Kruti Samiti) थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार करत, मंडळाच्या कार्यकारिणीवर फौजदारी गुन्हे (Criminal Cases) दाखल करण्याची मागणी (Demand) केली आहे.
चंद्रग्रहणात विसर्जन, हिंदूंच्या भावना दुखावल्या
यंदा लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल 36 तास रखडल्यानंतर रविवारी रात्री 9.10 वाजता पार पडले. समुद्रातील भरतीमुळे गणेशमूर्ती तराफ्यावर न नेता आल्यानं विलंब झाला. अखेर ओहोटी सुरू झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मात्र या प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे गणपतीचे विसर्जन चंद्रग्रहणाच्या काळात झाले. यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून, कोळी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
उत्सवाचे बाजारीकरण, भाविकांची अहवेलना
मच्छिमार समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विसर्जन प्रक्रियेतील गोंधळामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
तसेच राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. मंडळातील सदस्यांनी उत्सवाचे बाजारीकरण केले असून, भाविकांची अवहेलना होत आहे असाही आरोप त्यांनी केला.
लालबागचा राजाचे दर्शन घ्यायला आलेल्या एका लहान मुलीशी गैरवर्तन झाल्याचा व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामुळे भक्तांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे असं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
कोळी बांधवांना डावलण्यात आलं
वर्षानुवर्षे विसर्जन सोहळा कोळी बांधवच पार पाडत आले आहेत. यंदा पहिल्यांदाच त्यांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. विसर्जन चंद्रग्रहणात करणे हा फक्त बाप्पांचा नव्हे तर कोळी समाज आणि हिंदू भाविकांचा अपमान आहे असा आरोप मच्छिमार कृती समितीने केला आहे.
मच्छिमार कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्या
दर्शन प्रक्रियेत तातडीने बदल करून VIP संस्कृतीवर मर्यादा आणाव्यात.
VIP दर्शनासाठी फक्त एकच दिवस राखीव ठेवावा.
भाविकांची चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पंडाल मोकळा ठेवावा.
विसर्जनाचा मान कोळी समाजाला कायम ठेवावा आणि एक दिवस आगरी-कोळी बांधवांसाठी राखीव करावा.
या सर्व मागण्यांसह मच्छिमार समितीने लालबागच्या मंडळाच्या कार्यकारी सदस्यांवर फौजदारी कारवाई व्हावी, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
