उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी संजय राठोड (Sanjay Rathod) प्रकरणावरुन टीका केल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांना उत्तर दिलं. अनिल परब यांना उत्तर देताना त्यांनी वारंवार उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत तुमच्यात हिंमत असेल तर त्यांनाच तुम्ही क्लीनचीट का दिली असं विचारा असं आव्हान दिलं. तसंच सोयीप्रमाणे एखाद्या विषयावर बोलून, नंतर तोंड गप्प करायचं अशी टीकाही केली.
‘बरं झालं तुम्ही आलात, तुमची वाटच पाहत होते. मनिषा कायंदे यांनी दिशा सालियन विषय घेतला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी पुनर्विचार याचिका दाखल करायची असून, त्यांच्या डोक्यात काही प्रश्न आहेत आणि त्यावर चर्चा सुरु होती. प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले. एसआयटीचा रिपोर्ट आणि सत्य जनतेसमोर आलं पाहिजे अशी मी भूमिका मांडली. त्यावर संजय राठोड यांचा विषय काढण्यात आला. संजय राठोड यांच्यावर चित्रा वाघ यांनी जे करायचं होतं ते मी केलं. जे मला दिसलं, पुरावे आले त्यावर मी लढले. तेव्हा काय तुम्ही तोंड शिवून बसला होतात?,” अशी विचारणा चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना केली.
यावर अनिल परब यांनी शेपूट घातलं होतं अशी कमेंट करताच चित्रा वाघ यांनी म्हटलं, “तुम्ही घातलं होतं शेपूट, मला बोलू द्या पूर्ण. मला विचारता की ते कसे काय मंत्रिमंडळात आले? अनिल परबजी तुमच्याच हिंमत आहे का उद्धव ठाकरेंना विचारण्याची, त्यांनी क्लीन चिट दिली. अनिल परब फार हुशार आहेत, विधिज्ञ आहेत असं मी ऐकत आहे. मला तर हुशारी दिसली नाही”.
“मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, आज संजय राठोड मंत्रिमंडळात का आहेत याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. कोपऱ्यात नाही तर मीडियासमोर दिलं. तुम्ही ऐकलं तर मग उत्तर का दिलं नाही? सोयीप्रमाणे आपलं तोंड गप्प करायचं आणि महिलांवर दादागिरी करायची. मला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना क्लीनचीट का दिली विचारा. आमच्याबद्दल बोलता तेव्हा शहाणपणा कुठे जातो. या लोकांमध्ये हिंमत आहे का? उद्दव ठाकरेंना विचारा क्लीनचीट कोणत्या मुद्दायावर दिली”, असं आव्हानच त्यांनी दिलं.
“मी तर माझी लढाई लढली आणि लढणार. ओ अनिल परब हिंमत आहे का तुमच्यामधे? माझं नाव घेऊन बोलण्यात आलं आहे म्हणून मी उत्तर देत आहे. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपटपंडित. मी जे दोन वर्षं सहन केलं आहे ते पाहायला तुम्ही आला नव्हता. एखाद्या विषयावर बाई लढते तेव्हा पाय खेचायला 100 लोक असतात, तुमच्यासारखे तर आहेतच. मी काय तुम्हाला घाबरत नाही. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते. आम्ही काय इथे वशिल्याने आलेलो नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
“यांनी क्लीन चीट दिली नसती तर आज ते जे म्हणत आहे ते झालं नसतं, काही झालं की आमच्या घरावर येतात. हिच्या नवऱ्याला पकडलं असं बोलतात. आम्ही तिथे लढलो. माझ्या नवऱ्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. मी कोर्टातही माझी भूमिका मांडली. ती मुलगी माझी कोणी लागत नव्हती. जे समोर आलं त्यावर भूमिका मांडली. परवा त्या मुलीचे वडील आले आणि मला अजून दोन मुली असल्याचं सांगितलं. मला वाईट वाटलं. मी काय सहन केलं नाही, यांच्या चेल्यांनी काय कमी त्रास दिला. तो सगळा एका मुलीला न्याय देण्यासाठी सहन केला. यांच्या सरदाराने क्लीन चीट दिली आणि विषय संपवून टाकला,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
“जेव्हा काही राहत नाही तेव्हा बाईच्या घऱावरती, तिच्या बाकीच्या गोष्टींवर बोललं जातं. तेच यांनीही केलं. यांचा महिलांचा आदर मी पाहिला आहे. मला हलक्यात घेऊ नका सांगत आहे. आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील हे मी जबाबदारीने सांगत आहे. जे झालं त्यासाठी मी लढले. आम्ही एसआयटीचा रिपोर्ट मागितला तर यांची ही हालत झाली. रिपोर्ट बाहेर येईल तेव्हा काय होईल. आमच्या घरावर कशाला येता. जो प्रश्न तुम्ही काढला तो उद्धव ठाकरेंना विचारायची हिंमत ठेवा. मला घेऊन चला मी येते, नाहीतर ते येतील तेव्हा मी विचारते. य़ेत नाही, भेटत नाही, बोलत नाही म्हणून आम्हाला धरणार,” असंही त्या म्हणाल्या.
