: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला होता. 31 जानेवारीला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडला होता. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या. या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राज्यसभेची ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Politics)
सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची दोन वर्षांची टर्म बाकी आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत 4 जुलै 2028 ला संपणार होती. मात्र, ही जागा घेण्यापेक्षा पार्थ पवार यांना राज्यसभेची सहा वर्षांची पूर्ण टर्म असलेल्या जागेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. लवकरच राज्यसभेची ही जागा भरली जाईल. त्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही राजकारणात आणखी सक्रिय होतील, असा अंदाज होता. यापूर्वी या दोघांनी बारामतीमध्ये लोकसभा आणि निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, आता अजित पवार यांच्या निधनामुळे या दोघांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. एकीकडे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून राज्यात सूत्रे सांभाळतील, तर जय पवार हे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता दिसत आहे. पक्षाच्या बैठकीत या संदर्भात पार्थ पवारांनी नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. याआधी सुद्धा पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक 2019 मध्ये लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता.
Sharad Pawar: शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द
शरद पवार हे मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला आहे. बारामतीवरून मुंबईला रवाना होण्यापूर्वी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात, जिथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्या स्थळाला भेट दिली. तेथे त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवारांच्या नियोजित स्मृतीस्थळासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले, मुंबईतून ते दिल्लीला जाणार होते, मात्र, त्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.









