सोमय्यांना पाहताच ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक; दादरच्या हनुमान मंदिराबाहेर राडा
दादरच्या हनुमान मंदिराच्या आवारात ठाकरेंचे शिवसैनिक आणि भाजपचे किरीट सोमय्या आमने सामने आले आणि एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. किरीट सोमय्यांना पाहताच ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत किरीट सोमय्यांना बाहेर काढलं.
दादरच्या हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिली होती. त्यावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते. आदित्य ठाकरे आज या मंदिरात येऊन महाआरती घेणार आहेत. पण त्याच्या आधीच भाजप नेते किरीट सोमय्या दर्शनासाठी आले. त्यावेळी मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
किरीट सोमय्यांना पाहताच ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी भाजप आणि सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे हिंदुत्व घेत आहेत. कारण या मुद्द्यावर डिपॉझिट जप्त झाली आहेत. ज्यांनी हनुमान चालीसा वाचणाऱ्यांना जेलमध्ये टाकले त्यांना हनुमानाच्या चरणी जावे लागत आहे अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंचे भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह
दादर रेल्वे स्टेशनजवळच्या हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिली होती. शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावरुन महायुती सरकारवर टीका केली. भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभं करत भाजपला आरोपीच्या उभा करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी शनिवारी त्या मंदिरात जाऊन आरती करणार असल्याची घोषणा केली.
रेल्वेने नोटिशीला स्थगिती दिली
या सर्व घडामोडी पाहता भाजप काय करणार याकडे सर्वांच लक्ष होतं. भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा हनुमान मंदिरात पोहोचले आणि रेल्वेने नोटिशीला स्थगिती दिल्याची घोषणा केली. मंदिरात नित्य पूजा, आरती सुरुच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या पाठपुराव्याचा आर्वजून उल्लेख त्यांनी केला.
त्यानंतर मात्र आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली. हनुमान मंदिराला घाईघाईने स्थगिती दिली. काल उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व एक्स्पोज केलं आणि आज रेल्वेने स्थगिती दिली अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
आदित्य ठाकरे मंदिराला भेट देणार
दादर स्टेशनबाहेरच्या नोटीस आलेल्या हनुमान मंदिराला आदित्य ठाकरे आज संध्याकाळी साडेपाच वाजता भेट देणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंची शिवसेना तिथे महाआरती करणार आहे. 80 वर्षे जुन्या मंदिराला नोटीस दिल्याचा मुद्दा शिवसेनेनं आक्रमकपणे हाती घेतलाय. काल उद्धव ठाकरेंनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला. बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाहीत आणि राज्यात मंदिरं असुरक्षित आहेत अशी टीका काल उद्धव ठाकरेंनी केली होती.