महाराष्ट्रात खळबळ उडवणारी बातमी! ’25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील’; मोठा दावा
विधनसभेच्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला मतदान पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये अनेक संस्थांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र त्याचवेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार असल्याचा दावाही अनेक संस्थांच्या आकडेवारीमधून करण्यात आला आहे. दोन्ही बाजू एकमेकांना तुळबल्य असून मतमोजणीच्या दिवशीच काय ते अंतिम चित्र स्पष्ट होईल असं असतानाच आता मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भातील दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. महाविकास आघाडीने तर बहुमत मिळाल्यास 26 तारखेच्या आत सरकार स्थापन करु असं गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये ठरवलं आहे. दुसरीकडे नवी दिल्लीमध्येही झारखंड आणि महाराष्ट्रातील एक्झिट पोलमध्ये कल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने बैठकींचं सत्र सुरु झाल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असं सांगितलं जात असतानाच सहाव्या क्रमाकांवर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस राहील असं एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहे. अशातच आता अजित पवार हेच 25 नोव्हेंबर रोजी शपथ घेतील असा विश्वास त्यांच्या विधान परिषदेच्या आमदाराने व्यक्त केला आहे.
एक्झिट पोल काय सांगतात?
अजित पवार यांनी बंड करुन 2023 च्या मध्यात महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची जादू फार चालली नाही. त्यांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आला. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकावर जाईल असा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 42 हून अधिक जागांवर यश मिळेल असं विविध एक्झिट पोलमधील आकडेवारी सांगत आहेत. तर दुसरीकडे हेच एक्झिट पोल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 22 ते 25 जागा मिळतील असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
अजित पवार ठरणार किंग मेकर
एकीकडे अजित पवार हे सहा महत्त्वाच्या पक्षांमध्ये तळाशी राहतील असा अंदाज असतानाच दुसरीकडे अजित पवारांकडील जे काही 22-25 आमदार असतील तेच सत्ता कोणाची येणार हे ठरवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे. “कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून निसटत सरकार महायुतीच येणार,” असं मिटकरी भाकित व्यक्त करताना म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, “येणाऱ्या 25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील” असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. सत्ता स्थापनेत अजित पवार हे किंग मेकर असल्याचं ही ते म्हणाले आहेत.
पुण्यात झळकले ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले अजित पवारांचे बॅनर्स
पर्वतीमध्ये अजित पवारांचे बॅनर झळकले असून निकालाच्या आधीच झळकेलल्या या बॅनर्सने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मोठ्या मताधिकाऱ्याने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन असं या बॅनरवर लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे अजित पवारांचा उल्लेख ‘मुख्यमंत्री’ असा करण्यात आला आहे. “मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन,” असं मजकूर या बॅनरवर आहे.