देश

अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक! राणेंना धूळ चारणारी मनसेत, शिवसेनेच्या…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकाच दगडामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असे दोन पक्षी मारण्याचा पराक्रम केला आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेच्या गळाला एक मोठा मासा लागला असून ‘मातोश्री’च्या अंगणातच हे नाट्य रंगलं आहे. विशेष म्हणजे नारायण राणेंना पराभूत करणारी ही महिला नेता भाजपाला सोडचिठ्ठी देत मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेच्या पराभवाला ठरल्या कारणीभूत
2019 मध्ये शिवसेनेनं उमेदवारी नाकारल्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणाऱ्या या महिला नेत्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला होता. या महिलेमुळेच वांद्रे पूर्वमध्ये म्हणजेच ‘मातोश्री’च्या अंगणात शिवसेनेला पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. वांद्रे पूर्व येथील शिवसेनेचे उमेदवार दिवंगत विश्वानाथ महाडेश्वर यांचा झिशान सिद्दीकि यांनी पराभव केला होता. या पराभवासाठी त्यावेळी अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या आणि मोठ्या प्रमाणात मतं मिळालेल्या तृप्ती सावंत जबाबदार असल्याचं सांगितलं गेलं. आता याच तृप्ती सावंत यांनी मनसेमध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा ‘मातोश्री’च्या अंगणातील पराभवानंतर तृप्ती या मनसेमध्ये जाणार असल्याने हा ठाकरे गटासाठी भविष्याच्या दृष्टीने धोक्याचा इशारा मानला जात आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर तृप्ती यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तृप्ती सावंत शिवसेनेचे माजी दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आता राज ठाकरेंच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तृप्ती सावंत यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली असून त्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दीकींविरुद्ध लढणार आहेत.

राणेंना केलं पराभूत
तृप्ती सावंत यांनी लढवलेली 2015 मधील वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक गाजली होती. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं. त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यावेळी शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. 2015 च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्याविरोधात काँग्रेसकडून नारायण राणेंना रिंगणात उतरण्यात आलं होतं. थेट ‘मातोश्री’ला चॅलेंज देण्यासाठी नारायण राणे यांनी शड्डू ठोकला होता. आधी एकतर्फी वाटणारी आणि सहानुभूतीच्या लाटेवर असणारी ही निवडणूक, चांगलीच चुरशीची झाली होती. ‘मातोश्री’च्या अंगणात नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं. या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास 20 हजारांच्या फरकाने नारायण राणेंचा पराभव केला होता.

कोंबड्या घेऊन नाचले शिवसैनिक
तृप्ती सावंत यांच्या विजयानंतर त्यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करताना हद्द पार केली होती. शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करताना हातात कोंबड्या घेऊन राणेंविरोधात घोषणा दिल्या जात होत्या.

अजित पवारांनीही उडवलेली खिल्ली
काही वर्षांपूर्वी याच पराभवावरून अजित पवार यांनीदेखील नारायण राणेंची खिल्ली उडवली होती. ‘बाईनं पाडलं बाईन’ अशा शब्दात अजित पवारांनी राणेंची खिल्ली उडवली होती.

Related Articles

Back to top button