Sharad Pawar: अध्यक्षपदाबद्दल शरद पवार एक-दोन दिवसात निर्णय घेणार, राष्ट्रवादीच्या उद्याच्या बैठकीकडे लक्ष
राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याबाबत येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया खुद्द शरद पवार यांनी दिली आहे. दोन दिवसानंतर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.
शरद पवारांच्या अध्यपदाच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील असलेली अस्वस्थता दोन दिवसांत संपण्याची शक्यता आहे. कारण पक्षातल्या लोकांच्या तीव्र भावना मला दिसत असून मी हा निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला असल्याचं पवार म्हणाले. नवं नेतृत्व तयार व्हावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मला एक खात्री होती की मी तुमच्याशी चर्चा केली असती तर तुम्ही सकारात्मकता दर्शविली असती, तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती. पण मी ते केलं नाही अशी प्रांजळ कबुली शरद पवारांनी आपल्या प्रेमापोटी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संवादा दरम्यान दिली.
राष्ट्रवादीच्या उद्याच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
राष्ट्रवादीचा अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांनी दिल्यानंतर राज्यांत मोठया प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळतं आहे. शरद पवार यांनी आपल्याला विचार करायला वेळ द्या असं म्हटलं आहे तर दुसरीकडे अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची उद्या बैठक होणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा देण्याची घोषणा केली आणि त्यानंतर राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांनीच अध्यक्षपदी राहावं अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा करताना एका कमिटीची देखील घोषणा केली आणि याच कमिटीच्या माध्यमातून अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जाईल असं जाहीर केलं. याच कमिटीची उद्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार आहे
अध्यक्ष निवडीच्या समितीत कोण आहे?
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.
एबीपी माझा ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार उद्या पार पडणाऱ्या अध्यक्ष निवडीच्या समितीमध्ये पुढील अध्यक्षाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये सध्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची नावे आघाडीवर असल्याच पाहायला मिळत आहे.
एकीकडे अध्यक्षपदाबाबत सुप्रिया सुळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची चर्चा असताना दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावरून राज्यस्तरापर्यंत सर्वच कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनीच अध्यक्षपद स्वतःकडे ठेवावं अशी मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर शरद पवारांना राजीनामा दिला तर परिणाम होईल असं कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे.
देशात 2024 साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाची मोट बांधायचे असेल तर शरद पवार यांनीच पक्षाची कमान सांभाळायला हवी असं विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचा म्हणणं आहे. याचाच भाग म्हणून राहुल गांधी, स्टॅलिन यासारख्या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांना फोन करून विनंती केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.