देश

डान्स बारचं ‘ठाणं’, ठाण्याचे डान्स बार, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बिनधास्त ‘छमछम’

लायटिंगचा झगमगाट, बॉलिवूडच्या गाण्यांचा (Bollywood Songs) कानठळ्या बसवणारा आवाज आणि बेभान होऊन नाचणाऱ्या बारबाला, अखंड बरसत असलेला पैशांचा पाऊस. हे चित्र आहे ठाण्यातलं. होय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Ekanth Shinde) ठाण्यातलं… मुख्यमंत्र्यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे डान्स बार (Dance Bar) धूमधडाक्यात सुरू आहेत.

सगळ्या कायद्यांची पायमल्ली करून आणि नियमांची पार ऐशीतैशी करून हे डान्स बार सुरु आहेत. ठाण्यातील कोपरी, कापूरबावडी, तलावपाळी भागात अगदी पहाटेपर्यंत डान्स बारचा हा धांगडधिंगा सुरू असतो. झी २४ तास इन्व्हेस्टीगेशनच्या टीमनं मध्यरात्र उलटल्यानंतर अँटिक पॅलेस, आयकॉन, आम्रपाली अशा डान्स बारमध्ये धडक मारली तेव्हा तिथे बारबालांचा सर्रास डान्स सुरु होता.

2005 साली तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला. कोर्टानं विशिष्ट अटी आणि शर्ती घालून डान्स बार सुरू करायला पुन्हा परवानगी दिली.

डान्स बारसाठीचे नियम
डान्स बारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही
डान्स बारबालांवर नाणी उडवता येणार नाहीत
बारबालांना केवळ टीप देता येईल
सायंकाळी 6.30 ते रात्री 11.30 पर्यंतच डान्स बार सुरू राहतील
बारबालांसोबत डान्स किंवा कोणतंही अश्लील कृत्य करता येणार नाहीत

असे नियम कोर्टानं आणि पोलिसांनी घालून दिलेत. मात्र झी २४ तासच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचा पर्दाफाश झालाय. अगदी पहाटेपर्यंत डान्स बारची ही दुनिया रंगलेली असते.

कधीकाळी याच डान्स बार विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खळ्ळ खटॅकची आक्रमक भूमिका घेतली होती. रात्रभर सुरू असलेल्या छमछममुळं नागरिकांना त्रास होत असल्यानं त्यांनी स्वतः डान्स बार फोडले होते.

पण आश्चर्याची बाब म्हणजे आता त्यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे डान्स बार सुरू आहेत. नियमांची अजिबात पर्वा न करता. या डान्स बार मालकांना ना कायद्याची भीती आहे, ना पोलिसांची. कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय डान्स बार मालकांची एवढी हिंमतच होणार नाही. डान्स बारवाल्यांची पाठराखण करणारे हे हात कुणाचे? पहाटेपर्यंत सुरू असलेला हा धांगडधिंगा कुणाच्या आशीर्वादानं सुरूय? या डान्स बारना पाठिशी घालणाऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय कारवाई करणार? हा खरा सवाल आहे..

Related Articles

Back to top button