Search
Close this search box.

Satara Tarali Pump Storage Project: साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पाटण तालुक्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरून (Satara Tarali Pump Storage Project) आता वाद चांगलाच पेटला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच प्रकल्पाचे काम सुरू केल्याचा ठपका ठेवत पाटण वनविभागाने 13 नोव्हेंबर रोजीच अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस बजावत काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी अभिनेते सयाजी शिंदे आणि प्रकल्पविरोधी लढ्याचे नेते विवेकानंद पाटील यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देत पाहणी केली. हे काम अनधिकृत असल्याचा आरोप करत त्यांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. त्यामुळे तारळी प्रकल्पाचा वाद आता अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या कामावरून गेल्या काही दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत असतानाच आता वनविभागाच्या नोटिशीने या प्रकल्पाच्या अडचणी वाढल्या आहेत. 13 नोव्हेंबर 2026 रोजी पाटण वनक्षेत्रपाल कार्यालयाने अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस बजावली. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी नसतानाही प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व काम तात्काळ थांबवून तीन दिवसांत काम सुरू करण्याबाबतचा खुलासा आणि वृक्षतोडीसह इतर वैधानिक परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा वन कायद्यानुसार कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी अभिनेते सयाजी शिंदे आणि विवेकानंद पाटील यांनी प्रकल्पस्थळी भेट देत कामाची पाहणी केली. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी नसताना काम सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सह्याद्रीतील 23 प्रकल्प हटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची भूमिका विवेकानंद पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे वनविभागाच्या आदेशानंतर आता पोलीस तक्रारीमुळेही तारळी प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

वनविभागाच्या आदेशात नेमकं काय? (Satara Tarali Pump Storage Project Marathi News)

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, पाटण वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील मौजे तारळी परिसरामध्ये आपल्या तारळे पम्प्ड स्टोरेज प्रोजेक्ट (Tarali Pumped Storage Project PSP) चे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीअंती असे दिसून आले आहे की, प्रकल्पासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (National Board for Wildlife – NBWL) पूर्वपरवानगी प्राप्त नसतानाही आपल्यामार्फत प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात आले आहे. सदर बाब अत्यंत गंभीर असून प्रचलित वन व वन्यजीव कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणारी आहे.
तरी, या कारणे दाखवा नोटिसीद्वारे आपणास खालीलप्रमाणे सक्त आदेश देण्यात येत आहेतः

  • काम तात्काळ थांबविण्याबाबतः सक्षम प्राधिका-यांची व राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (NBWL) रीतसर पूर्वपरवानगी प्राप्त होईपर्यंत, तारळी पम्प्ड स्टोरेज प्रोजेक्ट (Torali PSP) च्या विकाणी सुरू असलेले सर्व प्रकारचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे.
  • तात्काळ कारणे दाखवा खुलासाः राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (NIBWL) वैध पूर्वपरवानगी नसताना आपण प्रकल्पाचे काम कोणत्या अधिकारात व कशाच्या आधारे सुरू केले, याबाचतचा सविस्तर व लेखी खुलासा सदर नोटीस प्राप्त झाल्यापासून 03 दिवसांच्या आत या कार्यालयास समक्ष सादर करावा.
  • वृक्षतोड व इतर वैधानिक परवानगी पत्रे सादर करणेः सदर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये वृक्षतोड करणेकामी सक्षम प्राधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे का? असल्यास, एकूण किती झाडांच्या वृक्षतोडीची परवानगी घेण्यात्त आली आहे, त्याचे मूळ / साक्षांकित परवानगी पत्र तसेच प्रकल्पाशी संबंधित इतर सर्व वैधानिक मंजुरीची कागदपत्रे व नकाशे उपरोक्त मुदतीत या कार्यालयास सादर करावेत. विहित 3 दिवसांच्या मुदतीत आपला समाधानकारक खुलासा व आवश्यक परवानगीची कागदपत्रे सादर न केल्यास किंवा काम सुरू ठेवल्याचे आढळून आल्यास, वन कायद्यांनुसार आपणाविरुद्ध सक्त कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची गंभीर नोंद घ्यावी.

नेमका काय आहे प्रकल्प? (Tarali Pumped Storage Project)

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात तारळी नदीच्या खोऱ्यात अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (Adani Green Energy Limited) द्वारे तारळी पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प (Tarali Pumped Storage Project) उभारला जात आहे. हा 1500 मेगावाट क्षमतेचा ‘पंप्ड स्टोरेज’ जलविद्युत प्रकल्प आहे. यात विजेची मागणी जास्त असताना वरच्या जलाशयातून पाणी खाली सोडून वीज निर्माण केली जाते आणि मागणी कमी असताना तेच पाणी पुन्हा वर पंप केले जाते.

admin
Author: admin

और पढ़ें