सायबेरियातील प्लेगविरोधी संस्थेतील एका २८ वर्षीय संशोधकाचा तीव्र न्यूमोनियाने मृत्यू झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. प्लेगच्या संभाव्य धोका निर्माण होण्यासाठी आता रशियन अधिकाऱ्यांनी जवळपास २०० लोकांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवले आहे. मात्र रशियाने हा दावा फेटाळला आहे. रशियाची सार्वजनिक आरोग्य नियामक संस्था, रोस्पोट्रेबनादझोरने, या आजाराचे वर्णन ‘अज्ञात कारणाने झालेला न्यूमोनिया असे केले. संशोधनाच्या व्यावसायिक कामाशी संबंधित कोणतेही सूक्ष्मजीब तिच्या शरीरात आढळले नाहीत, असे म्हटले आहे.
लैबमध्ये काय झालं?
मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव दार्या शिपिलोवा असे आहे. शिपिलोवा इर्कुत्स्क प्लेगविरोधी संस्थेत काम करत होती.’डेली मेल’च्या वृत्तानुसार, तिने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, तिच्याकडून चुकून जिवंत जिवाणू असलेली एक टेस्ट ट्यूब फुटली आहे. रशियाच्या मंगोलिया सीमेला लागून असलेल्या शेजारील बुरियातियामध्ये एका क्षेत्रीय मोहिमेवर असताना ती आजारी पडली आणि त्यानंतर तिला शेलेखोव्ह रुग्णालयात दाखल करण्यात आले. २९ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, परंतु दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला.
शेकडो लोक देखरेखेखाली
दार्या शिपिलोवा या संशोधकाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी रुसी अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलली आहेत. आता पर्यंत कमीत कमी २०० लोक शेलेखोव्ह रुग्णालयात क्वारंटीन केले आहे. ज्या रुग्णालयात शिपिलोवाचा उपचार सुरु आहे. याशिवाय तीन रुग्णालयात क्वारंटाईने सारखे नियम लागू करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात हा आजार पसरला नाही आहे. इर्कुत्स्कचे गव्हर्नर इगोर कोबझेव्ह म्हणाले की, संशोधकाच्या संपर्कात आलेले सर्व लोक वैधकीय देखरेखेखाली आहेत. देखरेखेखाली कोणामध्येही लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यांच्या प्रयोगशाळेतील चाचणीचे निकाल नकारात्मक आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रोयोगशाळेजवळील एका ॲल्युमिनियम कारखान्यानेही कर्मचाऱ्यांना मास्क घालण्याचे आदेश दिले आहेत. तर तेथील संचालकांनी रहिवाशांना अफवा आणि परस्परविरोधी वृत्तांच्या प्रभावाखाली न येण्याचे आवाहन केले आहे.
शिपिलोवाचा मृत्यू प्लेगमुळेच झाला होता का?
शिपोलोवा हीचा मृत्यू प्लेगमुळेच झाला होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर शेजारील बुरियातिया प्रदेशाचे प्रमुख अलेक्सी त्सिदेनोव्ह यांनी सांगितले की, शिपोलोवा हीचा मृत्यू कदाचित प्लेगमुळे झाला असावा, बुरियातियामध्ये प्लेगची कोणतीही साथ पसरलेली नाही आहे, असे स्पष्ट केले आहे.
न्यूमोनिक प्लेग म्हणजे काय?
न्यूमोनिक प्लेग म्हणजे हा येरसिनिया पेस्टिस नावाच्या जिवाणूमुळे होणाऱ्या प्लेगच्या तीन प्रकारांपैकी एक आहे. ब्युबॉनिक प्लेगच्या विपरीत, जो सामान्यतः संक्रमित पिसवांशी संबंधित आहे. न्यूमोनिक प्लेग फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि श्वसनमार्गातील थुंकीच्या कणांद्वारे लोकांमध्ये पसरू शकतो. ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे आणि खोकला ही लक्षणे असू शकतात. तर काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांना खोकल्यातून रक्तमिश्रित किंवा पाण्यासारखा कफ पडू शकतो, असे अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, उपचार न केल्यास प्लेगचा मृत्युदर खूप जास्त असू शकतो, परंतु लवकर निदान झाल्यास लवकरात लवकर यशस्वीपणे उपचार करता येतात.








