Search
Close this search box.

पत्नीला परत मिळवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य! मित्राची हत्या केल्यानंतर शीर कापून पूजाघरात…; जमीन खोदली असता पोलीसही हादरले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ओडिशामधील बोलांगीर जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयास्पद प्रकारात, एका व्यक्तीने आपल्या दुरावलेल्या पत्नीला परत मिळवण्यासाठी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्याने शेजारच्या गावातील मित्राचे शिर कापून ते स्वतःच्या घरातील पूजाघरात पुरल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. 18 ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या तेबादामुंडा गावातील रहिवासी संतोष खारसेल (45) यांचा शिरच्छेद केलेला मृतदेह बागडा गावातील एका तलावात सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, पीडित व्यक्तीला अखेरच्या वेळी शत्रुघ्न साहू (40) याच्यासोबत पाहिले गेले होते. पोलिसांनी मुख्य आरोपी शत्रुघ्न साहू याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. साहूने जेवणाच्या बहाण्याने संतोषला बोलावले होते आणि त्याची हत्या केल्यानंतर मृतदेह तलावात फेकून दिला होते. तसंच त्याचे कापलेले डोके एका पूजाघरात लपवून ठेवले, असा आरोप आहे.

पोलीस आले तेव्हा करत होता ध्यान

तपासादरम्यान पोलिसांना समजले की संतोषला शेवटचे शत्रुघ्न साहू यांच्यासोबत पाहिले गेले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या एका पथकाने साहूच्या घरी भेट दिली. त्यावेळी साहू घरात ध्यान करत असल्याचे आढळून आले.  साहू याला ताब्यात घेण्यात आलं असता चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सुरुवातीला त्याने मद्यपान केल्यानंतर झालेल्या वादातून हत्या केल्याचा दावा केला. नंतर अधिक कसून चौकशी केली असता, सुमारे तीन वर्षांपूर्वी सोडून गेलेल्या आपल्या पत्नीला परत मिळवण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याचं त्याने कबूल केलं.  कबुलीजबाबानंतर, साहूच्या पूजाघरात पुरलेले मृताचे डोके बाहेर काढण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली.

बोलंगीरचे पोलीस अधीक्षक (SP) अभिलाष जी म्हणाले, “आरोपी आणि मृत व्यक्ती एकमेकांना ओळखत नव्हते. खारसेलची भेट झाल्यानंतर साहूने त्याला आपल्या घरी बोलावलं आणि त्याची हत्या केलीआम्ही आरोपीला अटक केली असून हत्येसाठी वापरलेले हत्यारही जप्त केलं आहे”.

“सुरुवातीला, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने डोके कुठेतरी फेकून दिले असावे, असा आम्हाला संशय होता. मात्र, पूजाघरातून डोके बाहेर काढल्यानंतर या प्रकरणातील नरबळीचा पैलू समोर आला,” असंही अधिकाऱ्याने सांगितलं.

जेवणाचे निमंत्रण देऊन शिरच्छेद

मुख्य आरोपी शत्रुघ्न साहू याने 18 ऑगस्ट रोजी संतोषला जेवणाच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले होते. संतोष झोपेत असताना साहू आणि त्याच्या काही साथीदारांनी त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली आणि त्यानंतर त्याचे धडापासून डोके वेगळे केले, असा पोलिसांना संशय आहे. या गुन्ह्याचा संबंध नरबळी आणि तंत्र-मंत्रासारख्या अघोरी प्रथांशी असू शकतो, असा तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

हत्येनंतर आरोपींनी संतोषचा मृतदेह गावाबाहेर नेऊन एका तलावात फेकून दिला, तर त्याचे कापलेले डोके साहूच्या घरातील पूजाघरात लपवून ठेवले. गुरुवारी स्थानिक नागरिकांना तलावाजवळ डोके नसलेला मृतदेह आढळला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली; त्यानंतर देवगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली.

पाच जणांना अटक 

हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी शत्रुघ्न साहू याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. साहूची आई, भाऊ आणि वहिनी यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तपास अधिकारी घटनेचा संपूर्ण घटनाक्रम जुळवण्याचा आणि यात इतर कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेत आहेत.

पत्नीला परत मिळवण्यासाठी बळी

अंधश्रद्धा आणि कथित जादूटोण्याच्या प्रकारांमुळे ही हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. चौकशीदरम्यान साहूने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, दुरावलेल्या पत्नीला परत मिळवण्याच्या आशेनेच त्याने हा बळी दिला होता. तपासातून असे समोर आले की, साहूची पत्नी गेल्या जवळपास 10 वर्षांपासून आपला मुलगा आणि मुलीसह त्याच्यापासून वेगळी राहत होती. जादूटोणा किंवा काळ्या जादूच्या प्रकारांमधील त्याच्या सहभागामुळेच त्याचे कुटुंब त्याच्यापासून दूर राहिले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

आता पोलीस या गोष्टीचा तपास करत आहेत की, साहूने या कथित नरबळीचा कट एकट्याने रचला होता की त्याला इतरांची मदत मिळाली होती.

admin
Author: admin

और पढ़ें