दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला (Jantar Mantar Protest) पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं दिसून आलं. दादरच्या परिसरात जमलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ठिकठिकाणी ताब्यात घेतलं. त्याचवेळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेल्या आई आणि मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांच्या दडपशाहीविरोधात विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janta Party) वतीने दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मोठा जमाव जमल्याचं चित्र होतं. मात्र, या आंदोलनाला परवानगी नसल्याचं सांगत पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं दिसून आलं. तर काही ठिकाणी विद्यार्थिनी आणि महिलांना ताब्यात घेतलं.
आईसह मुलाला ताब्यात घेतलं
दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक महिला तिच्या मुलासह दादर परिसरात आली होती. मात्र पोलीस आपल्याला या परिसरात थांबू देत नसल्याचा आरोप तिने केला. आम्हाला चैत्यभूमीवर उभं राहू दिलं जात नाही, पोलीस बाजूला काढतात, असं ती माध्यमांना सांगत होती. त्याचवेळी त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं. त्याचवेळी त्या महिलेसोबत असलेल्या मुलाने टाहो फोडल्याचं दिसून आलं.
हा मुलगा रडताना तिची आई तिला समजावताना दिसली. तसेच आजूबाजूच्या लोकांनीही त्या मुलाला धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या आई आणि मुलालाही ताब्यात घेतल्याचं दिसून आलं.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हे आंदोलन केलं जात आहे.
नवी दिल्लीत आंदोलकांवर लाठीचार्ज
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आज ‘कॉक्रोच जनता पार्टी’ आणि आणि विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं. त्यानंतर या आंदोलकांनी आपला मोर्चा संसदेकडे वळवला. त्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या आंदोलनात हजारो विद्यार्थी, युवक आणि त्यांना पाठिंबा देणारे शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
सोनम वांगचुक रुग्णालयात असल्यानं अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात मोर्चा संसदेकडे वळला. मात्र यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी संसद मार्गावरील सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.








