गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरूच आहे. आज सकाळपासून मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. तर काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही तास सावधानतेचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पावसासोबतच 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळं नागरिकांना आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडा, असं आवाहन करण्यात येत आहे.
मुंबईत सकाळपासूनच पाऊस कोसळतोय आज रात्रीपर्यंत पाऊस असाच सुरू राहिला तर जनजीवन विस्कळीत होऊ शकते, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
पुढील पाच दिवस महत्त्वाचे
पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली कमी दाबाची स्थिती आणि महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीवर सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावरील परिसरांना रेड अलर्ट दिला आहे. या इशाऱ्यानुसार चारही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कमीच आहे. आज म्हणजेच शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर घाटमाथा, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
उद्या या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान विभागाकडून मुंबई, पालघर, ठाणेला उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं रविवारीही गरज असल्यास घराबाहेर पडा.








