मुंबईसह उपनगरातील मुसळधार पावसामुळे (Rain) वसईतील वाघराळ पाडा परिसरात बुधवारी भीषण घटना घडली. नाल्याला आलेल्या अचानक पुरामुळे पार्किंगमध्ये उभी असलेली तीन दुचाकी, एक वॅगनआर कार आणि मारुती कंपनीची एक इको कार पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरीकडे नवी मुंबईत (Navi mumbai) पावसाच्या पाण्यातून मार्ग काढत असताना दोन मुलींना वीजेचा धक्का बसल्याने रस्त्यावरच भयानक दृश्य पाहायला मिळालं. सुदैवाने एका धाडसी व्यक्तीच्या प्रसंगावधानतेमुळे दोन्ही मुलीचे प्राण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वसईत पावसाच्या पाण्यात अनेक वाहने वाहून गेले, घटनेदरम्यान इको कारमध्ये असलेले चंद्रकांत किणी यांनी प्रसंगावधान राखत धाडसी प्रयत्न केले. पाण्याचा वेग प्रचंड असतानाही त्यांनी दोघांना सुरक्षित बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. त्यांच्या धाडसाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ही घटना घडली. काही क्षणांतच पाण्याच्या प्रवाहाने पार्किंगमधील वाहने अक्षरशः ओढून नेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वसई-विरार परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच नाले, ओढे आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नवी मुंबईत दोन तरुणींना रस्त्यावरच करंट
नवी मुंबईत गेली तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे, अश्यातच नेरुळच्या एलपी जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. नेरूळ एल.पी. ब्रिजखाली भूमी अंतर्गत असलेली विद्युत वहिनी उघड्यावर पडली होती. अनेक वाहनाची त्यावरून ये जा झाल्याने त्या वायरवरील कोटिंग निघून गेले असल्याने उघड्या पडलेल्या वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली. दरम्यान, तेथून जाणाऱ्या 16 ते 20 वर्षांच्या दोन कॉलेज विद्यार्थिनी करंटच्या (विद्यूत प्रवाहाच्या) संपर्कात आल्या. विजेच्या धक्याने दोघीही पाण्यात पडल्या होत्या, जीवाच्या आकांतेने ओरडणाऱ्या या तरुणींना पाहून प्रकाश राजपुरोहित याने धाडस दाखवून हातातील गमछा आणि छत्रीच्या सहाय्याने दोघींचे प्राण वाचवले. छत्रीच्या साह्याने तरूणीची बॅग खेचून तरुणींना विजेच्या संपर्कातून बाहेर खेचले. सद्या तरूणींची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, याठिकाणी महापौर सुजाता पाटील यांनी भेट देत परिस्थिती पाहणी केली.








