Search
Close this search box.

‘झाड कोसळणं नैसर्गिक आहे,’ चेंबूरमध्ये 11 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर संजय शिरसाट यांचं विधान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतील चेंबूरमध्ये  मंगळवारी एका शाळेच्या बसवर झाड पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी झाड कोसळणं ही नैसर्गिक बाब असल्याचं म्हटलं आहे. एनडीटीव्हीशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, “काल घडलेल्या घटनेची सर्वांनाच कल्पना आहे. यासंदर्भात सरकार आज सभागृहात निवेदन करणार आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घेण्याचे निर्देशही महानगरपालिकेला देण्यात आले आहेत”.

‘हे झाड पडणार आहे असं कळत नाही’

पावसाळ्यापूर्वी सर्व तयारी करण्यात आल्याचे दावे पोकळ असून, अशा घटनांमुळे वास्तव समोर येत आहे असा आरोप विरोधकांकून केला जात असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “एका अर्ध झाडं पडणं, वीज कोसळणं, हे माणसाच्या हातात नाही. आता हे झाड पडणार आहे असं कळत नाही”.

‘झाड कोसळणं नैसर्गिक आहे’

संजय शिरसाट यांनी आम्ही ऑडिट नेहमी करतो असं सांगितलं आहे. परिसरातील लोक काम झालं नसल्याच्या तक्रारी करत असल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “नाही असं नाही होतं. काम पूर्ण होत असतं. झाड कोसळणं नैसर्गिक आहे. कधीतरी जोराचा वारा असतो, ज्यामुळे ते पडतं”.

यावेळी त्यांनी ही एक दुःखद दुर्घटना असल्याचंही म्हटलं. “जे घडले त्या घटनेमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे,” असं ते म्हणाले.

नेमकी घटना काय?

चेंबूरमध्ये ‘युनिव्हर्सल हायस्कूल’च्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शालेय बसवर रस्त्याच्या कडेला असणारं झाड मुळासकट उपटून पडलं. या अपघातात विहान श्रीवास्तव या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या मुलांपैकी चौघांना किरकोळ दुखापत झाली, तर एका मुलाला गंभीर दुखापत झाली. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून टीका

शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते क्लाईड कॅस्ट्रो यांनी हे विधान लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. “मंत्र्यांचे हे विधान अत्यंत असंवेदनशील आणि निर्लज्जपणाचे आहे. त्यांना जराही लाज वाटत नाही. एका मुलाचा जीव गेला आहे आणि ते मात्र झाड पडणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचं सांगत आहेत. एखादी व्यक्ती इतकी निर्लज्ज कशी असू शकते? हे काम मुंबई महापालिकेचं (BMC) आहे. मी याबद्दल वाचत होतो की, झाडांचे ऑडिट योग्य प्रकारे करण्यात आले नव्हते. बीएमसी आता रस्ते विभागावर दोषारोप करत आहे. वास्तविक, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट होणं आवश्यक असतं,” असं ते म्हणाले.

दरम्यान राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें