मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेला अटल सेतू आता आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे चर्चेत आला आहे. गेल्या अडीच वर्षांत या पुलावरून आत्महत्येचे एकूण १५ प्रयत्न झाल्याची नोंद असून, त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यासह संरक्षक जाळी उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषदेत आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. अटल सेतूवर वारंवार आत्महत्येच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. विशेषतः पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक जाळी उभारून अशा घटनांना आळा घालण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली दखल
यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सरकार या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट केले. आत्महत्यांच्या घटनांचा सखोल अभ्यास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून, ही समिती सुरक्षेतील त्रुटी, घटनांची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सरकारला अहवाल सादर करणार आहे. त्यानुसार पुढील निर्णय घेतले जातील.
काय म्हणाले मंत्री सामंत?
सामंत यांनी सांगितले की, अटल सेतूच्या काही भागांमध्ये संरक्षक जाळी बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या ठिकाणी तातडीने सुरक्षा जाळी उभारण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या जातील. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अलीकडेच पुण्यातील २८ वर्षीय तरुणाने अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यापूर्वीही अशाच प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पुलावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
२४ तास गस्त आणि आपत्कालीन मदतीची व्यवस्था
सरकारच्या माहितीनुसार, अटल सेतूवर सध्या २४ तास गस्त आणि आपत्कालीन मदतीची व्यवस्था उपलब्ध आहे. यासाठी तीन दुचाकी गस्ती पथके, तीन चारचाकी वाहने, दोन रुग्णवाहिका, दोन देखभाल पथके तसेच समुद्रात दोन स्पीड बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय सीसीटीव्हीद्वारे देखरेखही केली जाते. मात्र, या सर्व उपाययोजनांनंतरही आत्महत्यांच्या घटना पूर्णपणे रोखण्यात यश आलेले नाही.
अटल सेतूबद्दल…
अटल सेतू हा सुमारे २१.८ किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलांपैकी एक असून, मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी त्याची उभारणी करण्यात आली आहे. दररोज हजारो वाहने या पुलाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षितता अधिक मजबूत करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, संरक्षक जाळी, वाढीव गस्त, अधिक प्रभावी देखरेख आणि तातडीच्या हस्तक्षेपासाठी आवश्यक यंत्रणा उभारल्यास अशा घटना कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








