श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ या सिनेमाचा टीझर २८ ऑगस्ट रोजी रीलिज झाला. टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अशातच आता विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी सिनेमावर नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विठाबाई यांच्या मुलाने आणि नातवाने सिनेमाबद्दल मत व्यक्त केलं आहे.
नारायणगावकर कुटुंबीयांचं सिनेमाबद्दल मत
‘आवाज लोकशाहीचा’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विठाबाई यांचा मुलगा कैलास नारायणगावकर म्हणाले की, ‘या चित्रपटाबद्दल आम्हाला एकाच आठवड्यापूर्वी समजलं. आम्ही टीझर पाहिला आणि त्यामध्ये माझा जन्म स्टेजमागे झाल्याचं दाखवण्यात आलंय. आमच्या आईचा संघर्ष बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये दाखवत आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. मात्र, याआधी आम्हाला हे सांगायला हवं होतं. आम्ही त्यांच्याबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल आणखी माहिती दिली असती आणि यामुळे चित्रपट अधिक आशयघन झाला असता.’
‘ग्रामीण भागामध्ये ‘विठा’ या शब्दाला ‘ईठा’ बोलले जातं हे मान्य आहे. पण, त्यांचं खरं नाव विठाबाई आहे. आजच्या नव्या पिढीला त्यांच्या खऱ्या नावानं इतिहास कळाला तर समाधान वाटेल. लक्ष्मण उत्तेकर चित्रपट काढत आहेत याचा अभिमान आहे, पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो आमच्या कुटुंबाला दाखवावा ही आमची इच्छा आहे. जर चित्रपटामध्ये काही आक्षेपार्ह असेल तर ते सांगता येईल आणि काढून टाकता येईल.’ असंही त्यांनी पुढे सांगितलं.
सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी
‘महाराष्ट्रातील कोणत्याही लोककलावंताच्या नावापुढे त्याच्या गावाचं नाव लागलं तरच तो खरा कलावंत म्हणून शोभून दिसतो. चित्रपटाच्या निर्मात्यांकडे आमची मागणी आहे की, त्यांनी ‘ईठा’ नाव बदलून विठा करावं आणि नावापुढे सबटायटलमध्ये नारायणगावकर असं पूर्ण नाव द्यावं, अशा दोन ते तीन सूचना मेलद्वारे लक्ष्मण उतेकर यांच्यापर्यंत पोहचवल्या आहेत. आमचं फक्त नावाबद्दल म्हणणं आहे, बाकी चित्रपट तयार करण्यावरून आमचा विरोध नाही. जर त्यांनी संपर्क केला नाही तर १०० टक्के रीतसर कारवाई करणार आहे. २ ते ३ जुलैपर्यंत त्यांनी संपर्क केला तर ठीक, नाही तर जे काही कायदेशीर असेल त्याप्रमाणे कारवाई करणार. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या वकिलांशी चर्चा झाली असून पुढे काय होतंय यावर पुढचा निर्णय ठरवू. चित्रपट जर १०० टक्के चांगला असेल तर डोक्यावर घेऊ, पण यामध्ये आक्षेपार्ह काही असेल तर मात्र यावर कायदेशीर मार्गाने हे थांबवू.’ असं विठाबाई यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी सांगितलं.








