पुण्यात सारथीच्या कार्यक्रमात बसण्याच्या जागेवरून भाजपा आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादानंतर मेधा कुलकर्णी थेट कार्यक्रमातून निघून गेल्या. खासदार मेधा कुलकर्णी यांना कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसवण्यावरून अभिमन्यू पवार यांच्यासोबत नाराजीनाट्य रंगलं. खासदार मेधा कुलकर्णी यांना पहिल्या रांगेत बसण्यावरून अभिमन्यू पवार यांनी टोमणा लगावला. हा टोमणा ऐकताच नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून बाहेर पडल्या. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात उपस्थित होते.
पुण्यात सारथीच्या वतीने संघ लोकसेवा आयोग (MPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) व इतर उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हा सन्मान होणार होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मान्यवरही कार्यक्रमाला उपस्थित होते. याच कार्यक्रमात पुढील रांगेत बसण्यावरुन अभिमन्यू पवार यांनी टोमणा लगावला असता मेधा कुलकर्णी कार्यक्रम सोडून गेल्या. मराठ्याच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही. दुसऱ्या रांगेत बसा म्हणताच मेधा कुलकर्णींनी रागात कार्यक्रम सोडला.
यावर प्रतिक्रिया देताना अभिमन्यू पवार म्हणाले, “ताईंचा गैरसमज झाला. नरेंद्र पाटील अध्यक्ष असल्याने ते पुढे बसतील, आपण दोघे मागे बसू, एवढेच मी सांगितले. यात कोणताही जातीय वा वादाचा मुद्दा नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो”.
“मी त्यांना एवढंच म्हटलं की नरेंद्र पाटील पुढे बसतील कारण ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, तर आपण दोघं मागे बसू. मी त्यांना एवढेच बोललो आहे. ताईंनाही विनंती करतो की तुम्ही मी काय बोललो ते आठवून बघा,” असंही त्यांनी सांगितलं.
हा कार्यक्रम माझ्या घरचा नाही. त्या माझ्या नेत्या आहेत, वरिष्ठ आहेत. यानंतर देखील माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. निघून जावं की बसावं हा त्यांचा विषय आहे. पुढे एकच खुर्ची रिकामी होती म्हणून त्यांना विनंती केली असंही ते म्हणाले आहेत.








