मुंबईत शुक्रवारी (21 जून) मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. यावर तोडगा काढण्यासाठी रविवारी उशिरा रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बेस्ट कृती समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर बेस्टचा संप मागे घेण्यात आला. पण सोमवारी मुंबईच्या रस्त्यावर बेस्टची बस दिसली नाही. त्यामुळे मुंबईकर संभ्रात आहे.
यावर सचिन अहिर यांनी सांगितलं की, मुंबईकरांचे हाल व्हावे हा आमचा उद्देश नव्हता. आमचे प्रश्न आम्ही मांडले. आमच्या मागण्यांची दखल सरकारने घेतली आहे. त्यांनतर आम्ही संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, पण आंदोलन मागे घेण्यात आलेला नाही. समान काम समान दाम द्यायला पाहिजे अशी मागणी होती ती मागणी पूर्ण झाली आहे.
कर्मचाऱ्यांची थकीत ग्रॅच्युईटी याच वर्षी!
कर्मचाऱ्यांची थकीत ग्रॅच्युईटी रक्कम याच वर्षी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केली. नवीन वेतन करार होईपर्यंत, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये आणि कंत्राटी कामगारांना दरमहा 2 हजार रुपये हंगामी वाढ देण्याचा निर्णय या बैठकीत सरकारने घेतल्यानंतर संप मागे घेण्यात आला.
कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात, मात्र सेवा पूर्णपणे पूर्ववत नाही!
संपानंतर मुंबईत बेस्ट बस सेवा पूर्णपणे पूर्ववत झाली नसून ती लवकरच होईल असं सांगण्यात आलं आहे. मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा संप रविवारी रात्री मागे घेण्यात आल्यानंतर आज सकाळपासून कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे.
सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार डेपोमधून बस बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले असले तरी सेवा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही.
* BESTच्या मालकीच्या १८८ गाड्यांपैकी १६५ बस डेपोबाहेर
* १४५४ चालकांपैकी ८३५ चालक हजर
* २१९८ वाहकांपैकी १३२५ वाहक हजर
* २१२ स्थानक कर्मचाऱ्यांपैकी १७८ उपस्थित
* २०६ निरीक्षकांपैकी १३९ निरीक्षक कामावर
वेट लीज बस सेवा :
* २३३९ गाड्यांपैकी १२७१ बस रस्त्यावर
* २३७० चालकांपैकी ८८३ चालक उपस्थित
* ७५२ वाहकांपैकी १९८ वाहक हजर
बेस्ट कृती समितीचे संयोजक ADV उदय आंबोणकर यांनी सांगितलं की, कर्मचारी मागील तीन दिवसांपासून संपासाठी आगारात होते, दमले आहेत ते त्यामुळे हळूहळू सेवा पूर्ववत होईल.








