काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी फुटीचं राजकारण केलं आणि पक्षाला हादरा दिला. पक्षाचा 60 वा वर्धापन दिन तोंडावर असतानाच आमदारांनी केलेलं हे बंड महाराष्ट्राच्या राजकारणालासुद्धा एक वेगळीच कलाटणी देऊन गेलं. ज्यांच्यावर मतदार आणि पक्षानं विश्वास टाकला त्यांनीच अतिशय कठीण प्रसंगात पक्षाची साथ सोडली. मात्र, संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्यासह निष्ठावंतांच्या यादीत सातत्यानं दिसलेलं एक नाव आणि माध्यमांसमोर आलेला एक चेहरा म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा. याच वाजेंचं नाशिकमध्ये दमदार स्वागत करण्यात आलं.
मी पक्षाषी एकनिष्ठ आहे असं सुरुवातीपासूनच वाजेंनी स्पष्ट करत आपल्याशी कोणीही या फुटीच्या राजकारणाबाबत संपर्क साधला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि याच भूमिकेवर ते ठाम राहिले. दिल्लीतील पक्षबैठकीलाही त्यांनी उपस्थिती लावली आणि या आव्हानात्मक प्रसंगी पक्षाची साथ वाजेंनी सोडली नाही. परिणामी फुटीर आमदारांची जितकी चर्चा झाली, त्याहूनही जास्त चर्चा राजाभाऊ वाजे यांची झाली.
दिल्लीतील सर्व राजकीय घडामोडी, बैठका उरकून अखेर 18 जून 2026 रोजी जेव्हा वाजे नाशिकमध्ये परतले तेव्हा तिथं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मोठ्या संख्येनं शिवसैनिक रेल्वे स्थानकावर उपस्थित राहत वाजेंवर त्यांनी पुष्पवर्षाव केला, त्यांचं औक्षण करत इथं स्वागत करण्यात आलं. यावेळी शिवसेना UBT कार्यकर्त्यांकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. वाजेंच्या या कामगिरीसाठी नाशिक शहर, सिन्नर परिसरात त्यांच्या स्वागताचे बॅनरसुद्धा झळकले.
फुटीर खासदारांविरोधात निषेध
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार फुटल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय..वाशिम, हिंगोली, परभणी आणि बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. फुटीर खासदारांविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन केलंय.
‘शिंदे बोलतील ट्रम्पही आमच्या पक्षात येतायत’
आमदार फुटीच्या चर्चांवर संजय राऊतांनी विधान केलं असून, शिवसेना UBT खासदारांपाठोपाठ आता आमदारही फुटणार असल्याची चर्चा आहे. यावर आता खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर आलीय, शिंदे बोलतील आता ट्रम्पही आमच्या पक्षात येतायत असं राऊतांनी म्हटलंय.









