राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये मोठी फूट पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेमधील 9 पैकी पाच खासदार फोडणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदारांच्या फुटीच्या बातम्यांच्या अनुषंगाने डॅमेज कंट्रोलसाठी आधीच प्रयत्न सुरु झाल्याचं वृत्त आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचं पक्षाकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. ठाकरेंनी आपल्यासोबत खासदार कायम ठेवता आले नाही तर प्लॅन बी काय असावा याबद्दलचं नियोजन केल्याची माहिती मिळत आहे. हा प्लॅन बी काय आहे पाहूयात…
उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय म्हणाले?
खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका! सर्व खासदार आपल्यासोबत आहेत, असं सोमवारी पार पडलेल्या ईशान्य मुंबईच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर सांगितलं. खासदार आपल्यासोबत असल्याचा विश्वास पक्षप्रमुखांनी बोलून दाखवला. या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश पाठवण्याचा उद्देश होता. जे खासदार फुटणार अशा बातम्या समोर येत आहेत, त्या त्या मतदारसंघातील जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खासदार आपल्यासोबत असल्याचं सांगत पक्ष संघटित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरु
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटणार अशी चर्चा असताना ‘प्लॅन बी’अंतर्गत खासदार जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ता, पदाधिकारी पक्षासोबत राहायला हवा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न केले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. ईशान्य मुंबईतील आमदार विभाग प्रमुख पदाधिकारी यांची काल (सोमवार, 15 जून 2026 रोजी) उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बैठक घेतली. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे आपल्या सोबत आहेत. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं.
त्या खासदारांना सूचना…
ज्या खासदारांसंदर्भात संशय व्यक्त केला जातोय त्या खासदारांना सुद्धा स्पष्टीकरण देण्याच्या सूचना त्यांच्या शिवसेनेकडून वारंवार केल्या जात आहेत. पक्षाच्या बैठकीला आपण अनुपस्थित का राहिलो? हे सुद्धा कार्यकर्त्यांना सांगा व पक्षाची एकजूट राहू द्या अशा सूचनासुद्धा उद्धव ठाकरेंनी अनुपस्थित खासदारांना केल्या आहेत. त्यामुळे खासदार गेले तरी कार्यकर्ता पदाधिकारी आपल्य सोबत राहावा यासाठी पूर्णपणे तयारी ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जात असून या दृष्टिकोनातून सूचना आणि बैठका पक्षाकडून घेतल्या जात आहेत.
पाच खासदारांची चर्चा का?
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अनुपस्थित तेच खासदार काही दिवसांपूर्वी ‘मातोश्री’वर झालेल्या ठाकरेंच्या खासदारांच्या बैठकीला सुद्धा अनुपस्थित होते. तेव्हापासूनच शिंदेंच्या शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त चार खासदार हे ‘मातोश्री’वर बैठकीला उपस्थित होते. विविध कारणं देणारे पाच खासदार 13 जून रोजी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा अनुपस्थित राहिले होते. ते खासदार रविवारीसुद्धा बैठकीला अनुपस्थित होते. एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना त्यामुळे या पाच खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेपासून आणि प्रमुख नेत्यांपासून दुरावा कायम ठेवण्याचा विचार केला का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी आपण का आला नाहीत? याचे स्पष्टीकरण द्यावे अशा सूचना उद्धव ठाकरेंनी अनुपस्थित राहिल्या खासदारांना दिल्यानंतर या खासदरांनी स्पष्टीकरण दिलं. पाच खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्यांनी सांगितलं मात्र प्रत्यक्षात मीटिंग दरम्यान फक्त नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी उद्धव ठाकरेंचं बोलणं झाल्याचे समोर आलं आहे.
ते पाच खासदार कोण-
1) भाऊसाहेब वाकचौरे -शिर्डी
2) संजय देशमुख – वाशिम
3) नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली
4) संजय जाधव – परभणी
5) ओमराजे निंबाळकर – धाराशिव
ठाकरेंचे एकूण 9 खासदार असून त्यापैकी पाच खासदार फोडण्याचा विचार असून यासंदर्भात दिल्लीपासून गल्लीपर्यंत पडद्यामागे हलचाली सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही शिवसेनेकडून वेगवेगळे दावे केले जात असल्याने या खासदारासंदर्भातील संभ्रम कायम असल्याचं दिसत आहे.








