छगन भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभेची उमेदवारी आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल अप्रत्यक्ष आणि सूचकपणे का होईना नाराजी व्यक्त केली. तुमच्यावर अन्याय झाला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर, ‘अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल , कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे असं भुजबळांनी म्हटलंय. शिवाय दुस-यांची मुलं राज्यसभा, लोकसभेवर जातात, तोच न्याय लावा म्हटलं होतं असंही भुजबळांनी म्हटलं.. ‘मै कबड्डी का खिलाडी हूँ, शतरंज का खिलाडी नही हू’, अशी सूचक टिप्पणी केली. तसंच आपल्या उमेदवारीला भाजपनं नकार दिला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान त्यांच्या नाराजीवर सुनील तटकरे यांनी भाष्य केलं आहे.
“ते कबड्डीचेही चांगले खेळाडू आहेत आणि बुद्धिबळही कसं खेळावं माहिती आहे. भुजबळ त्यांच्या स्टाइलने सांगत असतात. ते मला उद्देशून बोलले असतील असं वाटत नाही. कारण मी लोकांमधून निवडून आलो आहे. माझी मुलगी अदिती आणि मुलगा अनिकेतही लोकांमधून निवडले गेले आहेत. माझे, त्यांचे गेल्या 35-40 वर्षांची सौहार्दाचे संबंध आहेत. त्यांचा आक्रमक स्वभाव अनेकांनी पाहिला आहे. त्यांनी एखादी पार्श्वभूमी सांगायचा प्रयत्न केला असावा,” असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
‘सुनील तटकरे आणि त्यांच्या मुलाला…’, भुजबळांचा थेट निशाणा; राज्यसभेवरुन राष्ट्रवादीत फूट?
पुढे ते म्हणाले, “बैठकीच्या प्रत्येक बाबी पत्रकारांजवळ बोलणं अभिप्रेत नसतं. पक्षाचा कोअर ग्रुप निर्णय प्रक्रियेत सहभागी असतो. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केल्यापासून या पक्षात नेहमीच लोकशाहीचया माध्यमातून चर्चा झाली आहे. पवार साहेब सहकाऱ्यांची मतं जाणून घ्यायचे. त्यावेळीही विरोधी मतं मांडली जात असत. दादांनीही ती भूमिका ठेवली आणि आता वहिनीही ती भूमिका ठेवतात”.
“संवाद पक्षाच्या प्रमुख कोअर ग्रुपच्या नेत्यांशी होत असते. आमदारांशीही संवाद होत असतो. पण शेवटी निर्णय प्रक्रिया अंतिम असते. कोणताही राजकीय पक्ष सर्वांचं समाधान करु शकत नाही. एखादी जागा असताना तिथे अनेक इच्छुक असणं साहजिक आहे. यात काही चूक नाही. त्यांनी पक्षासाठी योगदान दिलेलं असतं. पण जेव्हा संख्येनुसार मर्यादा येतात तेव्हा काहींच्या मनात वेगळ्या भावना निर्माण होत असतात,” असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
“बैठकीत निर्णय झाल्यानंतर ज्यावेळी उमेदवारी जाहीर करण्यासाठी गेलो तेव्हा छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि दिलील वळसे पाटीलही होते. त्यामुळे तो एकमताने निर्णय झाला आहे. भुजबळ 1999 सालापासून पक्षात आहेत. त्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली आहे. पक्षाची स्थापना झाली, लोकसभा, विधानसभेच्या निवडणूक लागल्या आणि ते उपमुख्यमंत्री झाले. पण या सगळ्या प्रक्रियेत त्यांचं योगदान, सहभाग मोठ्या प्रमाणात राहिला आहे,” असं त्यांनी सांगितलं.








