Search
Close this search box.

Biryani & Watermelon Family Death: अन्नातून विषबाधा नाहीच; शरीरात सापडली ‘ती’ डेंजर गोष्ट, घातपात की…?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचं गूढ लवकरच उलगडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मयत कुटुंबातील चौघांच्या शरीरामधील रक्ताची चाचणी करण्यात आल्यानंतर एका नमुन्यामधून या प्रकरणाचं गूढ उलगडणारे काही पुरावे समोर आले आहेत. तसेच या चौघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे संकेत देणाऱ्या काही गोष्टीही समोर आल्या आहेत. अब्दुल्ला डाकोडिया (वय 44), त्यांची पत्नी नसरीन (वय 35) आणि मुली आयेशा (वय 16) व झैनब (वय 12) अशी मृतांची नावं असून या प्रकरणातील धक्कादायक खुलासा रुग्णालयातील प्राथमिक तपासातून समोर आला आहे.

अन्नातून विषबाधा झालेली नाही?

मोबाईल ॲक्सेसरीजचे व्यावसायिक अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि दोन मुलींचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाल्याने मुंबईसहीत संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. त्यातच कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपल्याची बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेला चार ते पाच दिवस उलटून गेल्यानंतरही या मृत्यूसंदर्भात ठोस काहीच माहिती समोर येत नसताना रुग्णालयातील प्राथमिक तपासणीमधून धक्कादायक तपशील उघड झाला आहे. रुग्णालयातील प्राथमिक तपासणीत या चौघांचाही मृत्यू विषबाधेनेच झाल्याचे म्हटलं आहे. विशेष म्हणजे या चौघांना अन्नातून विषबाधा झालेली नसल्याचं प्राथमदर्शनी दिसत आहे.

रक्तात नेमकं काय सापडलं? त्याचा काय परिणाम होतो?

मृतांपैकी एकाच्या रक्ताच्या नमुन्यात मॉर्फिन आढळल्याने या गूढ मृत्यूंमागील संशय अधिकच बळावला आहे. मॉर्फिन अफूच्या वनस्पतीपासून मिळणारे एक अतिशय शक्तिशाली वेदनाशामक औषध आहे. मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करून वेदनांचे संकेत पोहोचवण्यापासून थांबवण्यासाठी मॉर्फिनचा वापर केला जातो. वैद्यकीय भाषेत याला ‘ओपिओइड ॲनाल्जेसिक’ म्हणतात. योग्य वैद्यकीय देखरेखीखाली मॉर्फिन सुरक्षित मानले जाते, परंतु त्याचे चुकीचे सेवन किंवा अतिवापर अतिशय घातक ठरू शकतो. मॉर्फिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास श्वास घेण्याची गती खूप कमी होते किंवा पूर्णपणे थांबते, ज्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता, सुस्ती, चक्कर येणे आणि गोंधळलेली अवस्था होणे असे मॉर्फिनचे सामान्य दुष्परिणामही शरीरावर जाणवतात.

घातपात की…?

मृताच्या शरीरात मॉर्फिन सापडल्याने या कुटुंबावर कोणी विषप्रयोग केला की त्यांच्यासोबत घातपात झाला याबद्दलचा संशय अधिक बळावला आहे. तसेच हा घातपात आहे की या चौघांपैकी एकाने चुकून मॉर्फिनचं सेवन केलं हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र या साऱ्या गोष्टींचा उलगडा होण्यासाठी अजून काही काळ पोलिसांनाही वाट पहावी लागणार आहे. पोलिसांना तीन अहवालांची प्रतिक्षा आहे.

‘या’ तीन अहवालांमधून समोर येईल सत्य

एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन ते चार पथके तयार केली आहेत. शवविच्छेदन अहवाल, अवयवांचे विश्लेषण आणि रासायनिक तपासणी अहवालांवर तपासाची दिशा मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचं तपास अधिकाऱ्यांपैकी एकाने सांगितलं. या अहवालांमधूनच या चौघांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

घरातून 11 गोष्टी घेण्यात आल्या ताब्यात

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनानाने (एफडीए) या प्रकरणात स्वतंत्र तपास सुरु केला आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी डाकोडिया कुटुंबाच्या घरातून एकूण 11 नमुने गोळा केल्याची माहिती एका अधिकाऱ्यानेच दिली आहे. गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये बिर्याणी, कलिंगड, मातीच्या भांड्यातील तसेच रेफ्रिजरेटरमधील पिण्याचे पाणी, कच्चा आणि शिजवलेला भात, चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश आहे. कच्च्या चिकनचा नमुना विशेषतः बीएमसीच्या प्रयोगशाळेत प्रथिनांच्या विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे, तर उर्वरित नमुन्यांची तपासणी एफडीएच्या प्रयोगशाळेत केली जात आहे. चिकनच्या प्रथिनांचे विश्लेषण सामान्यतः त्याची पौष्टिक गुणवत्ता आणि आवश्यक अमिनो ॲसिडची उपस्थिती तपासण्यासाठी केले जाते. यामुळे कोणतीही अनियमितता ओळखण्यासही मदत होऊ शकते, असं एफडीएने नमूद केले आहे.

संपूर्ण कुटुंब एकत्र येणार होतं

कुटुंबातील मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत असल्यामुळे डोकाडिया कुटुंब एकत्र जमण्याची योजना आखत होते. पाच भाऊ आणि दोन बहिणी व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येण्याच्या तयारीला सुरुवात केली होती. मात्र, योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच चौघांवर काळाने घाला घातला.

admin
Author: admin

और पढ़ें