आयपीएलच्या (IPL) 19 व्या हंगामातील सहाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादनं (Sun Risers Hyderabad) कोलकाता नाईट रायडर्सला 65 धावांनी पराभूत केलं. या सामन्यातील एका चुकीसाठी सनरायजर्स हैदराबादचा उपकर्णधार अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) अडचणीत आला आहे. आयपीएल प्रशासनाकडून अभिषेक शर्माच्या मॅच फीच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्याचा निर्णय घेतला. याशिवाय अभिषेक शर्माला एक डी मेरिट पॉईंट देखील देण्यात आला.
Abhishek Sharma : अभिषेक शर्माचं काय चुकलं?
सनरायजर्स हैदराबादनं केकेआर विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 226 धावा केल्या होत्या. हैदराबादनं एवढी मोठी धावसंख्या उभारण्याचं कारण होतं सलामीवीर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी केलेली आक्रमक सुरुवात , मात्र हैदराबादचे दोन्ही सलामीवीर अर्धशतकाचा टप्पा पार करु शकले नाहीत. सनरायजर्स हैदराबादचा सलामीवर अभिषेक शर्मा ब्लेसिंग मुजरबानीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. अभिषेक शर्मानं शॉट मारल्यानंतर केकेआरच्या वरुण चक्रवर्तीनं अफलातून क्षेत्ररक्षण करत कॅच पकडला. या कॅच संदर्भात संशय असल्यानं अभिषेक शर्माच्या आग्रहाखातर पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. मात्र, तिसऱ्या पंचांनी देखील अभिषेक शर्माला बाद ठरवलं. यानंतर अभिषेक शर्मा पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ही बाब आयपीएल प्रशासन आणि सामनाधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटू शकली नाही. अभिषेक शर्माला त्या कृतीसाठी एक डीमेरिट पॉईंट देण्यात आला. याशिवाय त्याच्या एका सामन्याच्या मॅच फीपैकी 25 टक्के रक्कम दंड म्हणून वजा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयपीएल प्रशासनाकडून यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. सनरायजर्स हैदराबादचा उपकर्णधार अभिषेक शर्मावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. ही कारवाई आयपीएल कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्या प्रकरणी करण्यात आली. अभिषेक शर्मानं त्याची चूक मान्य केली असून त्याचं कृत्य लेव्लह 1 मधील असून आर्टिकल 2.3 नुसार सामनाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. सामनाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई अभिषेक शर्माला देखील मान्य असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडनं सनरायजर्स हैदराबादला दमदार सुरुवात करुन दिली होती. मात्र, दोघेही अर्धशतक पूर्ण करु शकले नाहीत. अभिषेक शर्मा 48 तर ट्रेविस हेड 46 धावा करुन बाद झाला.
हैदराबादचा पहिला विजय
सनरायजर्स हैदराबादनं कोलकाता नाइट रायडर्सला 65 धावांनी पराभूत केलं. सनरायजर्स हैदराबादनं पहिल्या विजयासह गुणतालिकेत सहावं स्थान मिळवलं. आयपीएलच्या 19 व्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबादचा पराभव झाला होता.









