इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतात एलीपीजी गॅससंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील तणाव वाढत असल्याने हे संकट अधिक गहिंरं होण्याची भीती सर्वसामान्यांना आहे. याचा प्रभाव भारतीय बाजारपेठेत दिसू लागला आहे. लोक गॅस सिलेंडर उपलब्ध होईल की नाही यावरुन चिंताग्रस्त असून, स्वयंपाकासाठी इतर पर्यायांचा शोध घेत आहेत. यामुळेच इंडशन कूकटॉप म्हणजेच इलेक्ट्रिक शेगडींची मागणी अचानक वाढली आहे. खासकरुन ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीत मोठी वाढ दिसत आहे.
एका दिवसात 1 लाखाहून अधिक इंडक्शनची विक्री
ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Amazon वर इंडक्शनच्या कूकटॉपच्या विक्रीत रेकॉर्डब्रेक वाढ नोंदवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, एकाच दिवसात 1.34 लाखांहून अधिक इंडक्शन कुकटॉप विकले गेले आहेत. हा आकडा आश्चर्यकारक आहे. याचं कारण सर्वसामान्यपणे एका महिन्यता 1.80 लाख इंडक्शन शेगडींची विक्री होते. म्हणजेच एका महिन्यात जितकी विक्री होत होती, त्यासाठी आता फक्त काही दिवस लागत आहेत. यावरुन लोक एलपीजीचा पर्याय म्हणून इंडक्शनची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचं दिसत आहे.
चार दिवसांत 5 लाखांहून अधिक इंडक्शनची विक्री
गेल्या चार दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास ही परिस्थिती अधिकच रंजक असल्याचं लक्षात येत आहे. ॲमेझॉनव्यतिरिक्त इतर प्लॅटफॉर्म्सचाही समावेश केल्यास, 5 लाखांहून अधिक इंडक्शन कुकटॉप्सची ऑनलाइन विक्री झाली आहे. हा आकडा दर्शवतो की, लोक गॅसला पर्याय म्हणून इंडक्शन शेगड्यांचा वेगाने स्वीकार करत आहेत. या वाढत्या मागणीमुळे, अनेक ब्रँड्सना आपला स्टॉक भरून काढावा लागत आहे. पण प्रयत्न करूनही शक्य होत नसल्याने अनेकांनी स्टॉक संपल्याचं जाहीर केलं आहे.
अनेक कंपन्यांचा स्टॉक संपला
इंडक्शन कुकटॉप्सची विक्री करणाऱ्या कंपन्यांसाठी मागणीत झालेली वाढ आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ॲमेझॉनवर इंडक्शन कुकटॉप्सची विक्री करणाऱ्या सुमारे 100 कंपन्यांपैकी, जवळपास 70 कंपन्यांकडील स्टॉक पूर्णपणे संपला आहे. यावरून स्पष्ट होतं की, ग्राहकांची मागणी इतकी जास्त आहे की, पुरवठा कायम राखण्यासाठी कंपन्यांच्या नाकी दम येत आहे.किंबहुना, काही ब्रँड्सची उत्पादने तर अवघ्या काही तासांतच ‘आऊट ऑफ स्टॉक’ होत आहेत.
कोणत्या ब्रँडला सर्वाधिक पसंती
इंडक्शन कुकटॉपच्या विक्रीची आकडेवारी पाहिल्यास काही विशिष्ट ब्रँड्सना जास्त पसंती मिळत असल्याचं दिसत आहे. यांमध्ये, ‘Pigeon’ आणि ‘Prestige’ यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सनी अव्वल स्थान पटकावलं आहे.
एका दिवसाच्या आकडेवारीनुसार, ‘Pigeon’ चे सुमारे 30 हजार 14 युनिट्स विकले गेले, तर ‘Prestige’ ने सुमारे 29 हजार 878 युनिट्सच्या विक्रीची नोंद केली आहे. याव्यतिरिक्त, ‘Philips’ चे 15 हजार 18 युनिट्स विकले आहेत. ‘Kent’ च्या 7657 आणि ‘Milton’ च्या सुमारे 4736 युनिट्सची विक्री नोंदवली गेली. दरम्यान, ‘Allen’ आणि ‘Cadlec’ यांसारख्या ब्रँड्सनीही प्रत्येकी चार हजारांहून अधिक युनिट्सची विक्री केली. ही सर्व आकडेवारी एकाच दिवसात ‘Amazon’ वर मिळालेला प्रतिसाद दर्शवत आहे.
सर्च आणि ऑर्डरमध्ये वाढ
ई-कॉमर्स कंपन्यांनुसार , गेल्या काही दिवसांत ‘इंडक्शन कुकटॉप्स’च्या सर्च आणि ऑर्डर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सुरत येथील ‘ॲमेझॉन डिजिटल सेंटर’चे व्यवसाय प्रमुख संदीप कथिरिया यांनी सांगितलं आहे की, इंडक्शन कुकटॉप्समध्ये ग्राहकांचा रस वाढला आहे. जर आंतरराष्ट्रीय तणावाची ही परिस्थिती दीर्घकाळापर्यंत अशीच कायम राहिली, तर आगामी काळात इंडक्शन कुकटॉप्सची मागणी आणखी वाढू शकते. याचा अर्थ असा की, नजीकच्या भविष्यात विजेवर चालणाऱ्या स्वयंपाकाच्या उपकरणांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर विस्तारू शकते.
क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरही स्टॉक संपला
इंडक्शन कुकटॉप्सना असलेल्या प्रचंड मागणीचा परिणाम आता ‘क्विक-कॉमर्स’ (जलद-व्यापार) प्लॅटफॉर्मवरही दिसून येत आहे. अनेक शहरांमध्ये, Blinkit सारख्या क्विक डिलीवरी देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर इंडक्शन कुकटॉप्सचा स्टॉक संपला आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, ग्राहकांची मागणी केवळ नेहमीच्या ऑनलाइन खरेदी संकेतस्थळांवरच नव्हे, तर येथेही अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. जर हा कल असाच कायम राहिला, तर इंडक्शन कुकटॉप्सच्या वाढत्या पुरवठ्याची गरज पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना आगामी काळात त्यांचे उत्पादन वाढवावे लागू शकते.









