राज्यभरात 29 महानगरपालिकांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. यातील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलंय. मुंबई मनपा ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असल्याने यावेळी निवडणुकीनंतर कोणाचा झेंडा महापालिकेवर फडकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 15 जानेवारी रोजी यासाठी मतदान पार पडणार असून 16 तारखेला निकाल जाहीर केले जातील. निवडणूक प्रचारासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुमित वांजळे यांनी थेट शिवसेना UBT पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्री परिसरात प्रचार केला.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी शिवसेना UBT आणि मनसे पक्ष युतीमध्ये लढतोय. त्यापैकी एक महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक चुरशीची झालीये. दोन्ही ठाकरे बंधू निवडणूक प्रचारासाठी मुंबईचा गल्लीबोळा पिंजून काढताना दिसतायत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 93 साठीचे अधिकृत उमेदवार सुमित वांजळे यांनी उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर प्रचार केला. गुरुवारी सकाळपासून त्याची प्रचार रॅली ही मातोश्री परिसरात सुरु होती. शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि रिपब्लिकन सेना यांची मुंबईत महायुती असून त्यांनी प्रभाग क्रमांक 93 साठी अधिकृत उमेदवार सुमित वांजळे यांना उमेदवारी दिली आहे. सुमित वांजळे हे शिवसेना झोपडपट्टी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रमुख आहेत.








