घरात पाळणा हलावा असं प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असतं… पण पाळणा कितीवेळा हलला पाहिजे याबाबतही त्यांचं नियोजन असतं. मात्र आपल्या नेत्यांना मतदारांच्या फॅमिली प्लॅनिंगपेक्षा स्वतःच्या व्होट बँकेचं नियोजन जास्त महत्त्वाचं वाटतंय. कदाचित म्हणूनच कुणी म्हणतंय चार पोरं जन्माला घाला तर कोण म्हणतंय वीस पोरं जन्माला घाला. असे सल्ले देणाऱ्यांमध्ये अनेक नेते आघाडीवर आहेत.
पोरं जन्माला घालण्याची स्पर्धा लावणारे दोन चेहरे चर्चेत आले असून त्या दोन्ही चेहऱ्यांना फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश ओळखतो. नुसता ओळखत नाही, तर त्यांना चांगलाच ओळखून आहे. एक आहेत आपल्या हनुमान भक्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या माजी खासदार नवनीत राणा. तर दुसरे आहेत चिथावणीखोर भाषणासाठी ओळखले जाणारे एमआयएमचे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवैसी.
मौलवीच्या वक्तव्यानंतर वाद वाढला
कुणी किती पोरं जन्माला घालावी? हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न. मग हे दोन्ही नेते चार, आठ, बारा, वीस पोरं जन्माला घालण्याचा सल्ला का देताहेत? तर फोर एक्स स्पीडनं पोरं जन्माला घालण्याचा मुद्दा उपस्थित झाला तो एका मौलवीच्या वक्तव्यानं.
एका मौलवीने मुस्लिमांना वीस पोरं जन्माला घालण्याचा सल्ला दिला आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ नवनीत राणांपर्यंतही पोहोचला. मग त्यांनी देखील हिंदूंना तीन-तीन चार-चारं मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं.
निवडणुकीच्या मोसमात नवनीत राणांनी हा सल्ला देऊन नव्या राजकीय वादाला जन्म दिला. त्यांच्या सल्ल्याचं कुणी स्वागत केलं तर कुणी त्यांनाच या उपक्रमाची सुरूवात करण्याचा सल्ला दिला. अकोल्यात सभेसाठी आलेले असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणांना डिवचण्याची संधी साधली. नवनीत राणांच्या सल्ल्यातला चार मुलांचा आकडा त्यांनी थेट वीसवर नेऊन ठेवला.
ओवैसींना पाकिस्तानमध्ये पाठवा, नवनीत राणांचा सल्ला
आता मात्र नवनीत राणांचं पित्त खवळलं. सुरूवातीला त्यांनी चार मुलांना जन्म घालण्याचं आवाहन का केलं यावर सविस्तर उत्तर दिलं. आपण जे म्हटलंय ते देशाची डेमोग्राफी बदल होत असल्याने म्हटलंय. आसामध्ये घुसखोर आले त्यांची संख्या 200 टक्क्यांनी वाढली. मुंबईमध्येही आता घुसखोर आले. या देशात राहायचं असेल तर कायदे कानून पाळले पाहिजेत असं नवनीत राणा म्हणाल्या.
चार मुलं जन्माला घालण्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद करून झाल्यानंतर, नवनीत राणांनी ओवैसींना पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला. त्या ठिकाणी त्यांनी 10 मुलं जन्माला घालावीत किंवा 20 मुला जन्मानला घालावी असं नवनीत राणा म्हणाल्या.
आधी सरकार म्हणायचं हम दो हमारे दो, आणि आता सत्ताधारीच म्हणताहेत, हम दो हमारे चार. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील चार महिन्यांपूर्वी तीन मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं होतं.
नवनीत राणा, असदुद्दीन ओवैसी आणि त्यांच्या पंक्तीत बसणारे नेते मंडळी जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्याचा सल्ला देताहेत. कारण त्यांना राजकीय म्हणजेच मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण करायचं आहे. मात्र सध्या मुलांचं संगोपन करण्यासाठी आई-वडिलांना कोणती कसरत करावी लागते याची कल्पना त्यांना नाही, आणि कल्पना असली तरी त्यांना ती कसरत करावी लागत नाहीत.









