लातूरमध्ये (Latur News) भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस (Congress) कार्यकर्ते संतप्त झालेत. लातूरकरांचा उत्साह पाहून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, याची खात्री पटल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलेलं. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. त्यातच रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यावर दिवंगत नेते विलासराव देशमुखांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखनं आपली प्रतिक्रिया दिली. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, लिहीलेलं पुसता येत, कोरलेलं नाही, असं रितेश देशमुख म्हणाला. अशातच आता काँग्रेस नेत्यांचा रोष आणि रितेश देशमुखांच्या खरमरीत प्रत्युत्तरानंतर रवींद्र चव्हाणांनी सपशेल दिलगिरी व्यक्त केली आहे.
रवींद्र चव्हाण काय म्हणाले?
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, “लातुरमध्ये मी जे काही म्हटलं, मी विलासरावांवर जराही, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्या टिकाटिप्पणी केलेली नाही. विलासराव खूप मोठे नेते होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. लातुरात विलासरावांवरच फोकस ठेवून काँग्रेस तिथे मतदान मागतंय, त्यामुळे त्याठिकाणी आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात झालेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक दृष्टीकोनातून झाल्यात. यासंदर्भात मी तसं म्हटलं, पण तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव, जे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो… तुम्ही राजकीयदृष्ट्या याकडे पाहू नका, एवढं मी त्यांच्या चिरंजीवांना सांगेन…”
रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर म्हणून केलेली रितेश देशमुखची पोस्ट काय?
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख यानं रवींद्र चव्हाणांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. रितेश देशमुख म्हणाला की, “दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेल्या असतात. लिहिलेलं पुसता येतं. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र.” त्यानं मोजक्या शब्दांत सणसणीत उत्तर दिलं. रितेश देशमुखनं हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.









