भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना वनडे सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता आणि भारतात आल्यावर बीसीसीआयच्या (BCCI) बंगळुरू येथील रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत होता. त्यानंतर आता श्रेयस अय्यर बरा झाला असून त्याची न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिजसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. मात्र त्यापूर्वी श्रेयस अय्यरला कर्णधार पदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आलीये. श्रेयस अय्यर न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिजपूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. ज्यात तो मुंबई संघाचं नेतृत्व करेल.
श्रेयस अय्यरकडे मुंबईचं कर्णधारपद :
बीसीसीआयने भारतीय संघातील क्रिकेटर्सना देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीतील सामने खेळण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार रोहित विराट सह अनेक स्टार क्रिकेटर्सनी आपापल्या संघांकडून विजय हजारे ट्रॉफीतील सामने खेळले. श्रेयस अय्यर हा त्याच्या दुखापतीतून बरा होत होता त्यामुळे त्याने विजय हजारे ट्रॉफीतील सामने खेळले नव्हते. मात्र आता तो बरा झाल्यावर मुंबई संघाकडून दोन सामने खेळणार आहे. मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूर हा त्याला झालेल्या दुखापतीमुळे दोन सामन्यातून बाहेर पडलाय. तेव्हा त्याच्या ऐवजी श्रेयस आयरकडे मुंबईचं नेतृत्व देण्यात आलंय.
श्रेयस अय्यरसाठी परीक्षेसारखी मॅच :
श्रेयस अय्यर 6 जानेवारी रोजी त्याचा पहिला सामना खेळणार आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिला सामना तो हिमाचल प्रदेश विरुद्ध खेळेल. या सामन्यात अय्यरवर सिलेक्टर्सची खास नजर असेल, यात श्रेयसची मॅच फिटनेस पाहिली जाईल. या सामन्यात श्रेयसची फिटनेस योग्य नसेल तर त्याला कदाचित न्यूझीलंड सीरिजमधील सामन्यातून बाहेर ठेवलं जाऊ शकतं.
श्रेयस अय्यरचं करिअर :
विजय हजारे ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरचं प्रदर्शन उत्तम राहिलेलं आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये श्रेयसने आतापर्यंत एकूण 40 इनिंग खेळल्या असून यात 1829 धावा केल्या आहेत. यात श्रेयसची सरासरी 60 पेक्षा जास्त आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट 105 पेक्षा जास्त आहे. अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सात शतकं आणि सात अर्धशतकं झळकावली आहेत.









