महाराष्ट्र परिवहन विभागाने जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP बसवण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत दिली होती. ही मुदत आता संपली असून 1 जानेवारी 2026 पासून अशी प्लेट नसलेल्या वाहनांवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही अशा लाखो वाहनांचा यात समावेश आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कोणत्या वाहनांना लागू?
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुनी वाहने – दुचाकी, तिचाकी किंवा चारचाकी – यांना ही विशेष सुरक्षित नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. नवीन वाहनांना आधीपासूनच ही प्लेट असते. ही प्लेट चोरी रोखण्यासाठी आणि वाहन ओळख पटवण्यासाठी उपयुक्त ठरते, कारण त्यावर लेझर कोड आणि होलोग्राम असते जे सहज काढता येत नाही. फ्लाइंग स्क्वॉडच्या मदतीने नंबर प्लेटची तपासणी करून दंड आकारला जाणार आहे. पण ज्यांनी मुदतीत अपॉइंटमेंट घेतली असेल त्यांना सवलत मिळेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुदत का वाढवली?
सुरुवातीला मार्च 2025 ही मुदत होती, पण वाहन मालकांकडून कमी प्रतिसाद आणि तांत्रिक अडचणींमुळे सरकारने ती जून, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि शेवटी डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली. तरीही राज्यात अजून 27 लाखांहून अधिक वाहनांवर ही प्लेट बसवलेली नाही. नागपूर जिल्ह्यात तर 13 लाखांपेक्षा जास्त वाहने प्रलंबित आहेत.
नियम न पाळल्यास काय कारवाई?
HSRP नसलेल्या वाहनांचे हस्तांतरण, कर्ज फेडणे, पत्ता बदलणे, वाहन सुधारणा किंवा परवाना नूतनीकरण अशी कोणतीही आरटीओची कामे थांबवली जातील. रस्त्यावर तपासणीत सापडल्यास पहिल्यांदा 1000 रुपये, तर दुसऱ्यांदा 5000 ते 10 हजार रुपये दंड होऊ शकतो.
दंड टाळण्यासाठी काय करावे?
आत्ताच महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइट transport.maharashtra.gov.in वर जा. वाहन क्रमांक टाकून ऑनलाइन नोंदणी करा आणि पैसे भरून अपॉइंटमेंट घ्या. प्लेट बसवण्याची पावती पोलिसांना दाखवल्यास कारवाई होणार नाही. घरबसल्या नंबर प्लेट बसवण्याची सुविधाही उपलब्ध आहे पण त्यासाठी अतिरिक्त शुल्क लागू शकते.
आरटीओकडून आवाहन
परिवहन आयुक्तांच्या सूचनेनुसार आता कठोर अंमलबजावणी होणार आहे. वाहन मालकांनी लगेच प्लेट बसवून घ्यावी, अन्यथा रोजच्या वापरात अडचणी येऊ शकतात. ही प्लेट वाहन सुरक्षितता वाढवते आणि गुन्हे कमी करते, म्हणून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.









