मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडात रोज काही तरी नवीन गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांनी नुकताच नवीन खुलासा केला आहे ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. सौरभच्या हत्येची आरोपी असलेल्या मुस्कानची आई कविता रस्तोगी कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडत होती. एवढंच नाही तर ती आपल्या मुलीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होती, तिचेच आता भांड फुटलं आहे. कविता ही मुलगी मुस्कानची सावत्र आई असून सौरभही सासूच्या (कविताच्या) बँक खात्यात पैसे पाठवत असे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आता प्रश्न असा आहे की हे पैसे कधी पाठवले गेले आणि कुठे वापरले गेले? कशासाठी पैसे वापरले गेले? याचा तपास मेरठ पोलिसांनी सुरू केला आहे.
‘या’ कारणामुळे जावयाबद्दल सहानुभूती होती?
आधी मुस्कानची आई कविता ही जावई सौरभची बाजू घेताना दिसली. सौरभचे आपल्या मुलीवर खूप प्रेम होते आणि त्याने लग्नासाठी आपल्या कुटुंबालाही सोडले होते, असे तिने सांगितले. तिने त्याला मुलासारखे मानले होते असेही तिने सांगितले. मात्र सौरभच्या कुटुंबीयांनी कविताचे नाव घेत तीही सौरभकडून पैसे घेत असे, असे सांगताच या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. सौरभच्या कुटुंबीयांनी मुस्कानच्या कुटुंबावर पैशांबाबत अनेक आरोप केले आहेत, ज्याची आता चौकशी सुरू झाली आहे. आपल्या जावयासाठी अश्रू ढाळणारी आई आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा
मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम यांनी सांगितले की, ” सौरभकडे सुमारे 6 लाख रुपये होते, त्यापैकी 1 लाख रुपये मुस्कानच्या खात्यात गेले. पोलीस आता मुस्कान आणि तिची आईला कविताला रिमांडवर घेण्याची तयारी करत आहेत. दोन पथके तयार करण्यात आली असून, ते लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहेत. सध्या पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
कविताच मुस्कानला घेऊन गेली पोलिसात
4 मार्च रोजी मुस्कान आणि साहिलने मिळून सौरभची निर्घृणपाने हत्या केली होती. यानंतर दोघेही कशाचीही पर्वा न करता छान फिरायला गेले. पैसे संपल्यावर दोघे घरी परतले. घरी पोहोचताच मुस्कान तिने सगळा प्रकार तिची सावत्र आई कविताला सांगितला. यावेळी कविताने क्षणाचाही विलंब न लावता तिला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन आत्मसमर्पण करायला लावली. कविता म्हणाली की, सौरभ हा तिच्या मुलीसाठी सर्वस्व होता, पण मुस्कानने जे काही केले त्यासाठी तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आता हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे, कारण कवितेच्या सत्यतेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
