संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरत असलेल्या पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील ‘शिवशाही’ बसमधील बलात्कार प्रकरणात आज पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केली. मध्यरात्रीच्या सुमारास गुनाट गावातील नाट्यमय घडामोडींमध्ये अडीच तास शोध घेतल्यानंतर पोलिसांना दत्ता गाडे सापडला. पोलिसांनी दत्ता गाडेला अटक केल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले. यापैकी सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे आरोपी दत्ता गाडेने आत्महत्येचाही प्रयत्न केल्याची दाट शक्यता आहे. अमितेश कुमार यांनीच गावकऱ्यांच्या दाव्याचा संदर्भ देत याबद्दलची माहिती दिली आहे.
आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला पण…
अमितेश कुमार यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या मुद्द्यावरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अमितेश यांनी, “आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा सांगितलं जात आहे. मात्र दोरी तुटल्यामुळे त्याला आत्महत्या करता आली नाही असे गावकऱ्यांनी सांगितले,” असा उल्लेख केला.
पुढे बोलताना अमितेश यांनी, “त्याच्या (दत्ता गाडेच्या) गळ्यावर काही व्रण निदर्शनास आले आहेत. मात्र तपास प्राथमिक स्तरावर असल्यामुळे त्याबाबत अधिक सांगता येणार नाही,” असं सांगितलं. दत्ता गाडे मागील दोन दिवसांपासून आपल्या मूळ गावी लपून बसला होता. गुरुवारी रात्री पोलिसांना दत्ता गाडेच्याच एका नातेवाईकाचा फोन आल्यानंतर पोलीस गुनाट गावात मोठ्या संख्येनं दाखल झाले आणि जवळपास 900 लोकांनी अडीच तासाच्या सर्च ऑपरेशनमध्ये दत्ता गाडेला शोधून काढलं.
पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना
स्वारगेटसारख्या पुणे शहरातील मध्यवर्ती भागात बलात्कारासारखा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबद्दलही अमितेश कुमार यांनी पोलिसांची बाजू मांडली. पुणे शहरातील सुरक्षेबद्दलही अमितेश कुमार यांनी भाष्य करताना, “शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवणार आहोत. असे गुन्हे पुन्हा घडू नये म्हणून उपाययोजना राबवणार आहोत,” असं स्पष्ट केलं.
तसेच पुढे बोलताना, “शहरातील महिला सुरक्षेचे ऑडिट करण्यात आले आहे. गर्दीची ठिकाणे, निर्जन ठिकाणे यांचे ऑडिट केले आहे. गस्त वाढवली जाणार आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करणार आहेत,” असं अमितेश कुमार यांनी सांगितलं.
